डॉ. तात्याराव लहाने- सुलोचना लहाने
----------------------------------------------
कर्तृत्ववान बायको मिळाल्याचा अभिमान
मला माणसांत गुंतवणूक करायला जास्त आवडते, जी मी आत्तापर्यंत करत आलो आहे. शिवाय मला सोनंही आवडतं. सोन्याची काही ना काही गोष्ट मी घेत असतो. आम्ही दोघं जगत आलो. उमेदीच्या काळात घरासाठीचे अनेक चढउतार पाहिले. उमाच्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. मी फक्त कविता करतो. लेखन हा माझा प्रांत, तर उमा मालिकांमध्ये काम करणारी. आमची कार्यक्षेत्रं वेगळी असली तरी ती आमच्या नात्याच्या आड कधीच आली नाहीत. मी उमाला जेव्हा भेटायला जायचो, तेव्हा भरपूर गजरे आणि फुले घेऊन जात असे. या दोन्ही गोष्टी उमाला फार आवडतात. संघर्षाच्या काळात ती खंबीरपणे माझ्याबरोबर उभी होती. कधीही मान खाली जाऊ दिली नाही. ‘तुझी हिशेबाची वही का ठेवलीस? माझ्या कवितेच्या वहीवर, त्या दोघांना एकत्र बघून मला दाटून आला गहीवर' अशी माझी अवस्था होते. कर्तृत्ववान बायको मिळाल्याचा मला नेहमीच अभिमान होता आणि आहे. साथीदाराची सोबत असली की घर बनवणं आणि त्याचं नंदनवन करणं फारसं कठीण नसतं असंच मला वाटतं.
- चंद्रशेखर गोखले- उमा गोखले
--------------------------------
एकमेकांना साथ देत समजून घेणं हाच खरा व्हॅलेंटाईन डे!
प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे. या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसऱ्यावर जडला आहे ! मी माहीमचा, तर सोनाली अंधेरीची. आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. तेव्हा मी नाटकात काम करत होतो आणि प्रतिदिन २०० रुपये मानधन मिळायचे. तेव्हा व्हॅलेंटाईन डे चे एवढे महत्त्व नसायचे. जेव्हा आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा सोनालीने दहा मिनिटांत होकार दिला. क्षणभर मी अवाक् झालो. नंतर झालेल्या भेटीमध्ये आम्हाला एकमेकांचे विचार समजले. तिने मला एकच सांगितले, सागर, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात हवं ते काम करा. मी कायम तुमच्यासोबत असेन. एकमेकांना समजून घेण्याची हीच पहिली पायरी आहे. मी आज माझ्या कार्यक्षेत्रात जे काही नाव मिळवलंय त्यामध्ये सोनालीचा वाटा महत्त्वाचा आहे. तिला शॉपिंग करायला फार आवडते. मला कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून फार कमी वेळ कुटुंबीयांसाठी मिळतो; पण याबद्दल तिने कधीच कोणतीही तक्रार केली नाही. प्रेमासाठी कोणता ठरावीक दिवस नसतो. ह्या तर त्या भावना आहेत, ज्या कधीही येऊ शकतात.
- सागर कारंडे- सोनाली कारंडे
--------------------------