मुंबई : आपण सामाजिक जीवनात वावरताना समाजाला प्रेम दिले तर प्रेम मिळते, सेवा दिली तर सेवा मिळेल, जे-जे काही जसे द्याल, त्याची परतफेड होते, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्रीअरविंद सावंत यांनी व्यक्त केले. सत्शील आणि सद्भावनेने कार्य करणाऱ्या माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्यावरील स्नेहामुळेच समाजाचे त्यांना अविरत प्रेम लाभले आहे, असेही ते म्हणाले.माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सामाजिक कार्य करताना होणाºया आनंदाचे मोल ठरू शकत नाही. हा आनंद मिळावा म्हणूनच सामाजिक कार्यात झोकून दिले आणि त्यामुळेच आयुष्याच्या अखेरपर्यंत हे कार्य करत राहणार, असा मनोदय माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी व्यक्त केला़ तसेच केवळ शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी सर्व घटकातील मंडळी इतक्या मोठ्या संख्येने जमल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.समाजसेवेचा ध्यास घेऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा अविरत प्रयत्न डॉ. जगन्नाथराव हेगडे साहेबांनी आयुष्यभर केला. त्याचा प्रत्यय आज प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहिल्यामुळे दिसून येतो. साहेबांचा वाढदिवस हा आपल्या सर्वांसाठी एक सोहळाच आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्यासाठी व्यक्त केलेल्या भावना आहेत. डॉक्टर साहेबांना पुढील कार्य करण्यासाठी हे प्रेरणा देणारे आहे, असे विचार राहुल हेगडे यांनी व्यक्त केले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, लायन्स क्लबचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट अशोक मेहता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कमलेश दलाल, माजी आंतरराष्ट्रीय संचालिका अरुणा ओसवाल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रसाद पानवलकर, सुरेखा हेगडे, राहुल हेगडे, श्वेता अवर्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते.