मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार सध्या चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्यासमवेत असून युवकांची फळी अधिक मजबूत करण्याचं काम करत आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांवरही निशाणा साधत आहेत. तर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही टीका करताना दिसून येतात. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीच एका भाषणात बोलताना राष्ट्रवादीतील काही सहकारी ईडीच्या भीतीने सत्तेत गेल्याचं म्हटलं होतं.
आमदार रोहित पवार यांना त्याच अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. रोहित पवार भाजपाच्याविरोधात एवढं बोलत आहेत, मग त्यांच्यामागे ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा लागणार नाही, कशावरुन? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मला महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगायचं आहे की, मी या गोष्टींवर चर्चा करत नाही, याचा अर्थ मला लव्ह लेटर आलं नाही असं नाही. मला जे लव्ह लेटर आले आहेत, त्याला आम्ही उत्तर देत आहोत. येत्या काळात अशा विविध संस्थांच्या माध्यमातून आणखी लव्ह लेटर येतील त्याला आम्ही उत्तर देऊ. काळजी करू नका माझं वय ३८ वर्षे असून पुढे बराच काळ राजकारण करायचं आहे, माझी भूमिका बदललेली तुम्हाला कुठेही दिसणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.
मी राजकारणात केवळ पद घेण्यासाठी आलो नाही, एक विचारसरणीने आलोय. मराठी माणूस हा संघर्षांची तयारी मनात ठेवतो, संघर्ष करण्यासाठी तयार असतो, असेही रोहित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री होण्याची इच्छा तुमच्या मनात आहे का? असाही प्रश्न रोहित यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पद, कोणाचा वारसदार हे कोणी व्यक्ती ठरवत नसते. काळ आणि लोकं हे ठरवत असतात. त्यामुळे, सध्या आपल्या लोकांसोबत राहणे हेच महत्त्वाच आहे. शरद पवार यांच्यासोबत सध्या आपण आहोत आणि माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो करोडो तरुण त्यांच्यासमवेत आहेत, हेच मला सांगायचंय, असेही पवार यांनी म्हटलं.