प्रेमाचा ‘ओमकार’!
By admin | Published: April 1, 2016 02:42 AM2016-04-01T02:42:22+5:302016-04-01T02:42:22+5:30
चाळ ते बिल्डिंग असा प्रवास करत गेल्या १५ वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहणारी घाटकोपर येथील ओमकार एसआरए सोसायटी एकोपा, प्रेम आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण बनली आहे.
- लीनल गावडे, मुंबई
चाळ ते बिल्डिंग असा प्रवास करत गेल्या १५ वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहणारी घाटकोपर येथील ओमकार एसआरए सोसायटी एकोपा, प्रेम आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण बनली आहे. घाटकोपर येथील गौरीशंकरवाडी क्रमांक २ येथे ओमकार गृहनिर्माण ही एसआरए सोसायटी वसलेली आहे.
या सोसायटीत ८ मजली सहा इमारती असून एकूण ३२१ कुटुंबांचा समावेश आहे. या इमारतीत विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. या इमारती २००० साली बांधण्यात आल्या. पूर्वी या परिसरात चाळी होत्या. चाळी तोडून या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत इमारती उभारण्यात आल्या आहेत. सोसायटीत सर्व स्तरातील रहिवासी असल्याने अवाजवी खर्च न करता चांगल्या सोयी-सुविधा कमी खर्चात पुरवण्याकडे सोसायटीचा कल असतो. विशेष म्हणजे सोसायटीचे मासिक आकारणी शुल्कही अगदी कमी असल्याने रहिवाशांवर ताण येत नाही. आतापर्यंत सोसायटीच्या निधीतून गॅसलाइन आणि पाण्याची सोय करण्यात आल्याचे येथील नागरिक अभिमानाने सांगतात.
सणांची रेलचेल
गुढीपाडवा, होळी, मकरसंक्रांत, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी असे सारेच सण सर्वधर्मीय मिळून साजरे करतात. दरवर्षी २५ जानेवारीला सोसायटीत अन्नदान केले जाते. सोसायटीतील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे, यासाठी मंडळातर्फे सहली काढण्यात येतात.
आविष्कार
युवा मंडळ
सोसायटीत तरुणांचे आविष्कार युवा मंडळ कार्यरत आहे. या माध्यमातून तरुण विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यंदा पहिल्यांदाच महिलादिनी महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांना प्रोत्साहन
इमारतीत चार महिला बचतगट सक्रिय आहेत. चारही बचतगटांना इमारतीत
प्रोत्साहन मिळते. बचतगटातील महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
निसर्गप्रेमी : सोसायटीतील पडीक जागेवर तरुणांनी बाग फुलवली आहे. या ठिकाणी स्वखर्चाने बाक बसवण्यात आले आहेत. सायंकाळच्या वेळी येथे ज्येष्ठ नागरिक गप्पा मारतात, तर लहान मुले खेळतात.
आमचा कल विकासाकडे आहे. चांगल्या सुखसुविधा कमीत कमी पैशांत देण्याचा प्रयत्न करतो. पुढील काही वर्षांत सोसायटीत आणखी सुखसुविधा पुरविण्याचा विचार आहे. - श्रीराम मोरे, अध्यक्ष,
ओमकार सोसायटी