प्रेमात ‘सैराट’ झालं जी!

By admin | Published: May 28, 2016 03:08 AM2016-05-28T03:08:21+5:302016-05-28T03:08:21+5:30

कॉलेजमध्ये जुळलेल्या प्रेमाची चाहूल लागताच घरच्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या. हे समजताच त्या अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत

Love 'sirat' happened! | प्रेमात ‘सैराट’ झालं जी!

प्रेमात ‘सैराट’ झालं जी!

Next

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई

कॉलेजमध्ये जुळलेल्या प्रेमाची चाहूल लागताच घरच्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या. हे समजताच त्या अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत पळ काढला व चाळीसगाव येथे संसार थाटला. ‘सैराट’ चित्रपटाशी मिळत्याजुळत्या या प्रेमकथेची तक्रार पोलिसांकडे येताच गुन्हे शाखेने त्या कथित आर्चीची सुटका करून परशाला ताब्यात घेतले आहे.
‘सैराट’ चित्रपटातल्या कथेप्रमाणे प्रेमाचा संसार थाटणाऱ्या कथित आर्ची व परशाला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घणसोली येथून त्यांच्या प्रेमाला सुरवात झालेली होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये, फक्त वर्ग वेगळे. परंतु त्यांच्या प्रेमाची चाहूल मुलीच्या घरच्यांना लागली. यामुळे ती अल्पवयीन असताना देखील घरच्यांनी मनाविरुध्द तिचे लग्न जमवायच्या हालचाली सुरू केल्या. याला मुलगा व मुलगी यांच्यातली भिन्न जातीची भिंत कारणीभूत ठरली. त्यांच्या प्रेमकथेची सुरवात ही नुकत्याच गाजलेल्या ‘सैराट’ चित्रपटाप्रमाणेच होती. फरक एवढाच की ते सैराट झाले तेव्हा चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता व चित्रपटातल्या शेवटाप्रमाणे त्यांच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत झाला नाही.
घरचे लग्न जमवत असल्याची माहिती या कथित आर्चीला मिळताच तिने प्रियकरासोबत पलायन करून चाळीसगाव येथे संसाराला सुरवात केली. त्याठिकाणी संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे हवे असल्याने या परशाने देखील चायनिजच्या गाडीवर कामाला सुरवात केली. परंतु अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला होता. पोलिसांनी तपास करूनही काहीच निष्पन्न न झाल्यामुळे गुन्हे शाखेने हा तपास हाती घेतला होता. यानुसार उपायुक्त दिलीप सावंत यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर, अनिल सूर्यवंशी, विद्याधर गायकवाड व जगदीश पाटील यांच्याकडे तपास सोपवला होता. या पथकाने तीन दिवसांत नवी मुंबईतल्या कथित आर्ची व परशाला चाळीसगाव येथून शोधून काढले आहे. त्यानुसार मुलाला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले असून अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीला पळवल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तपासाअंती प्रेमात सैराट झालेल्या दोघांची कथा पोलिसांसमोर उघड झाली. परंतु मुलीने अल्पवयीन नसल्याचा दावा करत वयाचा पुरावा पोलिसांकडे दिला आहे. मात्र वडिलांनी ती अल्पवयीनच असल्याचे सांगत त्यांनी देखील तिच्या वयाचा पुरावा दिला आहे. यामुळे पोलीसही संभ्रमात पडले असून दोघांनी सादर केलेल्या वयाच्या पुराव्यांचा तपास करावा लागणार आहे.

Web Title: Love 'sirat' happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.