प्रेम करा ‘स्मार्ट’ली... सोशल मीडियावरील प्रेम आणि धोका, ब्लॅकमेलिंगमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:35 AM2018-02-14T03:35:58+5:302018-02-14T03:36:24+5:30
एके काळी चार भिंतीच्या आड दडलेले प्रेम काळानुरूप बदलत गेले. अवघ्या काही दिवसांच्या मैत्रीतून प्रेम आणि अनैतिक संबंधाचा ‘फास’ या तरुणाईभोवती गुंडाळला जातो. त्यातून बलात्कार, फसवणूक, ब्लॅकमेलिंग अथवा अनेकांना जीव देण्याचीही परिस्थिती ओढावलेली दिसून आली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : एके काळी चार भिंतीच्या आड दडलेले प्रेम काळानुरूप बदलत गेले. अवघ्या काही दिवसांच्या मैत्रीतून प्रेम आणि अनैतिक संबंधाचा ‘फास’ या तरुणाईभोवती गुंडाळला जातो. त्यातून बलात्कार, फसवणूक, ब्लॅकमेलिंग अथवा अनेकांना जीव देण्याचीही परिस्थिती ओढावलेली दिसून आली. त्यामुळे इतर मैत्रिणींप्रमाणे आपल्यालाही ‘बॉयफ्रेंड’ असावा, या हट्टापायी समोरच्या व्यक्तीची माहिती न घेता त्याच्यावर विश्वास ठेवणे, प्रेम करणे, शारीरिक संबंध ठेवणे आजघडीला धोकादायक होऊन बसले आहेत. हे सोशल मीडियावरील प्रेमी युगुलांनी जाणून घेणे गरजेचे आहे.
नामांकित रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाºया स्मिताची (नावात बदल) काही महिन्यापूर्वी ‘फेसबुक’वर इटलीच्या स्पायरो रॉड्रिक्स जॉन (३५) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे प्रेमात. काही दिवसांपूर्वी जॉनने तिला एक गिफ्ट पाठविले असल्याचे सांगितले. त्यानंतर अचानक तरुणीला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगत, जॉनचे गिफ्ट हे महागडे असून, कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ते मिळेल, असे त्या तरुणीला सांगितले. कस्टम अधिकाºयांनी सांगितलेल्या खात्यावर तिने ४७ हजार पाठविले. त्यानंतर, कस्टम अधिकाºयाच्या सांगण्यानुसार, टप्प्याटप्प्याने १० खात्यांमध्ये तब्बल ११ लाख ४३ हजार जमा केले. मात्र, त्यांच्या मागण्या संपतच नव्हत्या. त्यामुळे तिला संशय आला. दिल्लीला जाऊन तिने कस्टम अधिकाºयांकडे चौकशी केली आणि यात फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
गुन्ह्यांची आकडेवारी
एनसी आरबीच्या अहवालानुसार, २०१६ मध्ये मुंबईत ९८० गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये फसवणुकीचे ७११, स्वार्थासंबंधीचे ६४९, महिलेच्या अपमानाच्या हेतुपुरस्सर २०७, लैंगिक शोषणाचे ३९, ब्लॅकमेलिंगचे १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
असेही धोके... : फेसबुकवर मुलीची फ्रें ड रिक्वेस्ट पाहून तरुणाने ती स्वीकारली. दोघांमध्ये संभाषण वाढले. मुलीने थेट भेटायला बोलावले, म्हणून हादेखील नटून-थटून तेथे गेला. समोरून मुलीने हात दाखवून जवळ बोलावले आणि तेथे पोहोचताच ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्याला बेदम चोप दिला. त्याच्याकडील पैसे घेऊन पसार झाले. क्षणभर काय आणि कशासाठी झाले, हे त्यालादेखील उमगले नाही. अखेर तपासात उघड झाले - काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत पार्किं गवरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी तक्रारदार तरुणाने आरोपीच्या काकावर हात उगारला होता. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीचे बनावट फेसबुक अकाउंट बनविले व याच फेसबुक अकाउंटवरून तक्रारदाराची फसवणूक करत, त्याला लुटले.
पोलीस सांगतात....
मुंबई सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, तरुण पिढी ‘फेस टू फेस’ कमी बोलतात, मात्र, ‘स्क्रिन टू स्क्रिन’ संपर्क करणे जास्त सोपे आणि सोयीचे समजतात.
समोरच्या व्यक्तीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, इतरांप्रमाणे आपलेही सोशल मीडियावरचे फॉलोअर्स, फ्रेंड जास्त असण्यासाठी धडपड सुरू असते.
समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगणे कठीण असताना, आपली व्यक्तिगत माहिती, फोटो अशा माध्यमांवर पाठवू नये. स्वत:चे पासवर्ड, खासगी माहिती शेअर करू नये. जेणेकरून, आॅनलाइन ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा सायबर गुन्ह्यांना आपण बळी पडू शकतो.
काय करावे..
सोशल मीडियावरचा वापर मर्यादित ठेवा.
समोरच्या व्यक्तीवर संशय येत असेल, तर बोलणे टाळा.
अनोळख्या व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्टबाबत खातरजमा करा, ते ज्याचे मुच्युअल फ्रेंड असतील, त्यांच्याकडे विचारणा करा.
काय करू नये...
फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रें ड रिक्वेस्ट स्वीकारू नये.
सोशल मीडियावर खासगी फोटो, व्हिडीओ शेअर करू नये.
समोरची व्यक्ती कोण आहे, हे आपणास माहिती नसते, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
एकटे भेटणे टाळा, पैशांचा व्यवहार करू नका.