प्रेमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:31 AM2017-08-10T06:31:38+5:302017-08-10T06:31:38+5:30

तारुण्यात पदार्पण केलेल्या प्रेमीजीवांच्या प्रेमभावनेत आता नवल असे काही उरलेले नाही; परंतु एखाद्या प्रेमप्रकरणाची इतिश्री सामाजिक कार्यात होत असेल, तर ती नक्कीच दखल घेण्याजोगी गोष्ट ठरते.

Love of social work! | प्रेमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ!

प्रेमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ!

Next

राज चिंचणकर 
मुंबई : तारुण्यात पदार्पण केलेल्या प्रेमीजीवांच्या प्रेमभावनेत आता नवल असे काही उरलेले नाही; परंतु एखाद्या प्रेमप्रकरणाची इतिश्री सामाजिक कार्यात होत असेल, तर ती नक्कीच दखल घेण्याजोगी गोष्ट ठरते. मुंबईस्थित सनी पवार हा असाच एक तरुण, आरती या युवतीच्या प्रेमात पडला. मात्र, पुढे आरतीवर जीवन-मरणाचा प्रसंग येऊन ठेपला आणि त्यानंतर या दोघांची साथ नियतीने हिरावून घेतली; पण इथेच ही गोष्ट संपली नाही, तर या प्रेमभावनेच्या निमित्ताने अनोख्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
मुंबईत घडलेली ही एक सत्य घटना आहे आणि त्यातून समाजाला सकारात्मक दृष्टी मिळावी, या हेतूने ही कहाणी आता प्रभावी माध्यमातून दृश्यमानही होत आहे. सनीच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेच्या काळात एक निनावी हात त्याच्या पाठीवर स्थिरावला होता आणि या पाठबळामुळे त्याच्यात सकारात्मक विचारांची रुजवात झाली. अप्रत्यक्षपणे मदत करणारा हा हात कुणाचा असेल, याचा त्याने बराच शोध घेतला; परंतु त्या व्यक्तीने तिची ओळख कायमच लपवून ठेवली. मात्र, आरतीच्या निधनानंतर सनीला त्या व्यक्तीचा मागमूस लागला, तेव्हा तो थक्कच झाला.
आतापर्यंत त्याला मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, साक्षात एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने गारुड केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या होत्या. त्यांच्या रूपात सनीला खºया आयुष्यात एक ‘गाइड’ मिळाला. इतकेच नव्हे, तर आरती जेव्हा रुग्णालयात उपचार घेत होती, त्या वेळी सनीला साहाय्य्य करण्याच्या उद्देशाने वहिदा रेहमान यांनी एक सामाजिक संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या निमित्ताने एका नव्या सामाजिक कार्याचा शुभारंभही झाला. या वास्तव घटनेवर जेव्हा ‘आरती’च्या नावाने चित्रपट निर्माण करण्याचे घाटत होते, तेव्हाही सनी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी वहिदा रेहमान भक्कमपणे उभ्या राहिल्या.

Web Title: Love of social work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.