मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या किनारी भागात पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. साहजिकच यात मुंबईचा समावेश असून, हवामान खात्याकडील माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरातचा किनारी भाग येथेही काही प्रमाणात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकरण्याची शक्यता आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे ३१ मे नंतर मुंबईच्या वातावरणात बदल नोंदविण्यात येतील. येथील हवामान ढगाळ राहील. हवेचा वेग वाढेल. कदाचित १ जून रोजी मान्सून पूर्व सरींचा वर्षाव होईल. या काळात समुद्रात वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये. ५ जून पर्यंत असेच वातावरण राहणार असून, २ आणि ४ जून रोजी पावसाचे प्रमाण किंचित वाढेल. मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ३० मे रोजीच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. हवामान खात्याने मात्र यास दुजोरा दिलेला नाही.