Join us

कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या ७२ तासांसाठी मुंबईसह राज्यभरात पावसाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या ७२ तासांसाठी मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी, आजघडीला मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुरू असलेला पाऊस पुढील काही दिवस कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे आतापर्यंत राज्याच्या सर्व जिल्ह्यांत सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशी माहितीदेखील हवामान खात्याकडून देण्यात आली.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल. २३ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातदेखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भातदेखील सर्वसाधारणपणे हीच परिस्थिती राहील.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्याच्या सर्व जिल्ह्यांत सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुढचे अजून काही दिवस राज्यात पाऊस कोसळणार आहे.