मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात आता पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आता उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. तसेच आगामी १२ तासात याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील २४ तासांत ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकेल. परिणामी, याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढेल.
यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. राजस्थानमधून पाऊस आपला परतीचा प्रवास विलंबाने सुरू करणार आहे. जवळपास ७ ते ८ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल, असेही त्यांनी सांगितले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा प्रभाव आणखी वाढणार असून उत्तर आणि उत्तर - पश्चिम दिशेने ते पुढे सरकणार आहे. परिणामी, रविवारपासून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. याचा प्रभाव विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर राहील. कोकण, विशेषत: मुंबईवर देखील याचा प्रभाव जाणवेल, असं मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले आहे.