मुंबई : महापालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात बुधवारी दुपारी २:५० वाजता बिघाड झाला. त्यामुळे २० उदंचन पंपांपैकी १३ पंप बंद पडले. त्यामुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरीय व उच्चस्तरीय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरीय जलाशय, तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दुरुस्तीचे काम होईपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. यादरम्यान मुंबईसह ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणारा पाणीपुरवठासुद्धा कमी दाबाने होणार आहे.
पिसे येथील जल उदंचन केंद्रातील बंद पडलेले १३ पंप दुरुस्त करण्याचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले असून, टप्प्याटप्प्याने ते सुरू करण्यात येत आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पिसे केंद्रातील २० पैकी १७ पंप कार्यरत करण्यात आले असून, त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित ३ पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत. त्यामुळे, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
या आधीही लागली होती आग -
या आधी फेब्रुवारीमध्ये पिसे उदंचन केंद्रातील संयंत्राला आग लागली होती. त्यामुळे काही पंप बंद ठेवण्यात आले होते. तेव्हाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
धरणांत ३१ जुलैपर्यंत पुरले इतके पाणी -
१) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत बुधवारपर्यंत ५.३३ टक्के इतका पाणीसाठा होता. सध्या संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू असून, यापुढे ती वाढण्याची शक्यता नाही, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२) सात धरणांत ७७ हजार १३२ दशलक्ष पाणीसाठा असून, तो ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे आणखी कपातीची शक्यता तूर्तास टळली आहे.
३) उर्वरित शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.