कमी दाबाने पाणी; टँकरचे दर परवडेना; कमी पाणीसाठ्याची मुंबईकरांना धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:32 AM2023-05-26T09:32:36+5:302023-05-26T09:32:45+5:30
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजघडीला (२५ मेपर्यंत) सरासरी १४ टक्के इतकाच पाणीसाठा होता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून, तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे १४ टक्के साठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबईकरांच्या चिंतेत भर पडत असून, आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये पाणीकपात होणार की काय अशी भीती सामान्यांना वाटू लागली आहे. तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर मुंबईकरांची तहान भागविण्याचा विचार पालिका प्रशासन करत असली तरी अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे टँकरची संख्या वाढत आहे. झोपडपट्टी भागात एक हजार लिटर पाण्याला ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत असून, पालिकेच्या पाण्याची राजरोस विक्री होत आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजघडीला (२५ मेपर्यंत) सरासरी १४ टक्के इतकाच पाणीसाठा होता. दिवसेंदिवस पाणीसाठा खालावत असून, मुंबईकरांसोबतच जल विभागाचेही डोळे पावसाकडे लागले आहेत. यात भर म्हणजे मुंबईतल्या काही झोपडपट्ट्यात, व्यापारी संकुले, खासगी टँकर लॉबीकडून पाणीचोरीच्या घटना सुरूच आहेत. शिवाय पाणी गळती, पाणीचोरीमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईची तहान भागविण्यासाठी पाण्याची गरज भासत असताना दुसरीकडे टँकर लॉबीचा व्यवसाय मात्र तेजीत सुरू आहे.
राखीव साठ्याचा वापर
तलावांतील साठवणुकीच्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत आठ टक्के साठा राखीव असतो. आपत्कालीन परिस्थितीतच राखीव साठ्यातील पाण्याचा वापर करता येतो. यंदा पावसाने नियोजित वेळेत हजेरी लावली नाही तर राखीव साठ्यातून मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यास पुरवठ्याबाबत कोणतेही नियोजन करण्याची गरज भासणार नाही. मात्र वेळेत पाऊस पडला नाही किंवा दमदार हजेरी लावून पाऊस गायब झाला तर पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टँकरची जास्त मागणी
गोवंडी- मान खुर्द, अंधेरी पश्चिम, वडाळा, रे रोड, विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, कांदिवली, मालाड, गणपत पाटीलनगर, दहिसर येथील झोपडपट्ट्यांत पाणी गळती व चोरी जास्त प्रमाणात होत असल्याने वेळेत पाणी न येणे, कमी दाबाच्या पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे येथे पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहे.