Join us

म्हाडाच्या अल्प, अत्यल्प घरांच्या किमती ५ टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 6:42 AM

अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय : मुंबईतील डिसेंबरमधील लॉटरी विजेत्यांना फायदा

मुंबई : म्हाडामुंबई मंडळाच्या १,३८४ घरांसाठीच्या लॉटरीचा निकाल १६ डिसेंबरला जाहीर झाला. या लॉटरीत अल्प आणि अत्यल्प गटात घर लागलेल्या भाग्यवान विजेत्यांना म्हाडाने आणखी एक खूशखबर दिली आहे. या घरांच्या एकूण किमतीपैकी ५ टक्के किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अल्प आणि अत्यल्प गटातील लॉटरी विजेत्यांना घर आणखी स्वस्तात मिळेल, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी म्हाडाच्या अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या जाहिरातीत दिलेल्या किमती १० टक्क्यांनी कमी कराव्यात यासाठी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना पत्र लिहिले होते. म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच हा निर्णय जाहीर केला जाईल, असे चव्हाण यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र नंतर किमती कमी करण्याच्या श्रेयवादावरून हा निर्णय बासनात गुंडाळला गेला होता. बुधवारी यासंदर्भात म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सर्व सभापती आणि म्हाडा अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. यात मध्यम गटाला वगळून फक्त अल्प आणि अत्यल्प गटातील विजेत्यांच्या घरांची किंमत ५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किमती या १४ लाखांपासून ते २० लाखांपर्यंत आहेत. तर अल्प गटातील घरांच्या किमती या २० लाखांपासून ते ३५ लाखांपर्यंत आहेत. मात्र, आता घेण्यात आलेल्या नव्या निर्णयानुसार मुंबई विभागासाठीच्या डिसेंबरच्या लॉटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किंंमती ७ ते १० हजार रुपयांनी तर अल्प गटातील घरांच्या किमती १० ते १७ हजार रुपयांनी कमी होतील.नाराजी दूर करत दिली खूशखबरम्हाडाच्या अल्प, अत्यल्प व मध्यम गटांच्या घरांच्या किमती जास्त असल्याचा सूर ग्राहकांमध्ये होता. तो लक्षात घेता तसेच यासंदर्भात चव्हाण यांनी दिलेल्या पत्राचा सारासार विचार किमती पाच टक्क्यांनी कमी करत डिसेंबरमधील लॉटरी विजेत्यांना म्हाडाने खूशखबर दिली आहे.

टॅग्स :म्हाडामुंबई