अतिधोकादायक इमारती तत्काळ खाली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:35 AM2019-05-29T02:35:07+5:302019-05-29T02:35:32+5:30
अंधेरी येथील धोकादायक वृक्षाने पावसळ्यापूर्वीच एका पादचाऱ्याचा बळी घेतला आहे.
मुंबई : अंधेरी येथील धोकादायक वृक्षाने पावसळ्यापूर्वीच एका पादचाऱ्याचा बळी घेतला आहे. यामुळे वृक्षांबरोबरच धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. याची गंभीर दखल घेऊन या इमारती तत्काळ खाली करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप जीवांचे बळी जातात. त्यामुळे या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करण्यावर पालिकेचा भर असतो. मात्र रहिवाशी अन्यत्र स्थलांतरीत होण्यास तयार होत नाहीत. त्यात यावेळेस लोकसभा निवडणुकीमुळे अशा इमारतींची यादी जाहीर करण्याचे काम रखडले होते. मात्र आयुक्तांनी १५९ अति धोकादायक इमारतींची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत.
पालिकेच्या पाहणीनुसार इमारतींचे त्यांच्या स्थितीनुसार सी १ (अति धोकादायक, राहण्या अयोग्य व तात्काळ पाडणे), सी - २ ए (इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे), सी - २ बी (इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती), सी - ३ (इमारतीची किरकोळ दुरुस्ती).
सध्या ४९९ इमारती या ‘सी - १’ अर्थात अतिधोकादायक या वर्गवारीतील आहेत. सी - १ प्रवर्गामधील इमारतींना महापालिका अधिनियमाच्या कलम ३५४ नुसार नोटीस बजावून त्या इमारती पाडण्यात येत आहेत.
इमारती रिकाम्या करण्यात अडथळा निर्माण झाल्यास त्या इमारतीची विद्युत जोडणी व जलजोडणी खंडीत करण्यात येते.
एन विभागात (घाटकोपर) ६४, के/पश्चिम (अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम)- ५१ व टी विभागात (मुलुंड) ४७ इमारती अतिधोकादायक आहेत.
१९३ इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट तर ४६ इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. १५९ इमारतींचे वीज व जल जोडणी तोडणार.