Join us

खालच्या पातळीवरील 'राज'कारण, मनसे अधिवेशनाला 'महावितरणचा शॉक' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 8:43 PM

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेसह राज्याच्या राजकारणात पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत. 23 जानेवारी रोजी मनसेनं महाअधिवेशन बोलावलं असून मनसैनिकांकडून जोरदारी तयारी सुरू आहे. मात्र, महावितरण विभागाने मनसेला विजेचा शॉक दिला आहे. यावरून मनसेनं महावितरण विभागाला इशारा दिलाय. 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती. त्यावेळी शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्यासोबत आले होते. राज ठाकरे यांनी देखील पहिल्याच निवडणूकीत 14 आमदार विधानसभेत पाठवले. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करतच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा मनेसची मोठी पिछेहाट झाली. त्यामुळे, मनसे आता नवा विचार, नवा झेंडा आणि नवा अजेंडा घेऊन पुढे येत आहे. त्यासाठी, मनसेचं महाअधिवेशन होत आहे. मात्र,  मनसेच्या या महाअधिवेशनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून (एमएसईबी) भारनियमन केलं जाणार आहे. याविरोधात आता मनसेचे आवाज उठवला आहे.मनसेच्या महाअधिवेशनाचं आयोजन 23 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान करण्यात आलं आहे. पण, याच कालावधीत एमएसईबीकडून भारनियमन केलं जाणार आहे. यासंदर्भातील मेसेजेसही राज्यातील विविध भागातील ग्राहकांना केला जात आहे. महत्वाचे काम असल्याने 23 जानेवारी रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान विजपुरवठा बंद ठेवला जाईल, असे या मेसेजमध्ये सांगण्यात आलंय. मनसेनं या मेसेजवरुन महावितरण विभागाला इशारा दिला आहे. 

मनसेच्या अधिवेशनाच्या काळातच मुद्दाम वीज पुरवठा खंडित करण्याचा हा डाव असल्याचं मनसेन म्हटलंय. तसेच, “सरकारला असं काही करुन साध्य होणार नाही. हे खालच्या पातळीवर जाऊन केलेलं राजकारण आहे. ग्रामीण भागामध्ये असे संदेश अनेकांना गेले आहेत. त्यामुळेच असं केल्याने काहीच मिळणार नाही. आम्ही, एमएसईबीला यासंबंधी योग्य पद्धतीने जाब विचारू,'' असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय. त्ययांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मेसेजेचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहे. 

 

टॅग्स :मनसेमुंबईराज ठाकरे