५ वर्षांनंतर लोअर परळ पूल वाहतुकीसाठी खुला; करी रोडकडे जाणाऱ्या भाविकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:32 AM2023-09-18T11:32:46+5:302023-09-18T11:32:56+5:30
लोअर परळ (डिलाईल रोड) पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ ला बंद करण्यात आला.
मुंबई - पाच वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळ येथील रेल्वे उड्डाणपुलाची पूर्व दिशेची मार्गिका रविवारपासून सुरू झाली. राज्याचे शालेय शिक्षण व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नारळ फोडून गणेशमूर्ती आगमन मिरवणूक मार्गस्थ करत ही मार्गिका खुली करण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी पुलावरील करी रोड दिशेची वाहतूक सुरू व्हावी यासाठी दबाव वाढू लागल्याने नियोजित दिवसाच्या एक दिवस आधीच पालिकेने ही मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोअर परळ (डिलाईल रोड) पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ ला बंद करण्यात आला. विविध अडथळ्यांमुळे या पुलाचे काम रखडले होते. लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. लोअर परळ पुलाच्या पश्चिम दिशेची बाजू जूनमध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हा संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत वारंवार हुकली होती. गणेशोत्सवाच्या काळात लोअर परळ, करी रोड, लालबाग या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाची दुसरी बाजूही सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली होती. पुलाची आणखी एक मार्गिका खुली करताना ऑगस्ट महिन्यात पावसाची उघडीप मिळाल्याने काम वेगाने करणे शक्य झाल्याची माहिती पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.