लोअर परेलमध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारी ५७ अतिक्रमणे तोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 03:54 PM2018-04-19T15:54:32+5:302018-04-19T16:09:34+5:30
लोअर परेल परिसरात पांडुरंग बुधकर मार्ग व गणपतराव कदम मार्ग या दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारा शंकरराव नरम मार्ग आहे. याच शंकरराव नरम मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पदपथांवर गेल्या सुमारे ६ ते ७ वर्षांपासून कच्च्या स्वरुपाची ५७ अतिक्रमणे उद्भवली होती.
मुंबई - लोअर परेल परिसरात पांडुरंग बुधकर मार्ग व गणपतराव कदम मार्ग या दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारा शंकरराव नरम मार्ग आहे. याच शंकरराव नरम मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पदपथांवर गेल्या सुमारे ६ ते ७ वर्षांपासून कच्च्या स्वरुपाची ५७ अतिक्रमणे उद्भवली होती. या अतिक्रमणांमुळे पादचा-यांना आणि रस्त्यावरच्या वाहतूकीलाही अडथळे येत होते. या बाबी लक्षात घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पदपथांवरील अतिक्रमणे तोडून पदपथ मोकळे करण्यात आले आहेत. तसेच अतिक्रमणे पुन्हा उद्भवू नये आणि सुशोभिकरण देखील व्हावे, या उद्देशाने पदपथांवर सुमारे २.५ x १ फूट या आकाराच्या ८०० रोप कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली आहे.
महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार जी दक्षिण विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान शंकरराव नगर मार्गाच्या पदपथांवरील ५७ निवासी स्वरुपाची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ही कारवाई करण्यासाठी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अहमद उस्मान पठान यांच्या नेतृत्वात ४५ पोलीसांचा ताफा कार्यस्थळी तैनात होता. तसेच महापालिकेच्या जी दक्षिण विभागाचे ८० कामगार – कर्मचारी - अधिकारी देखील या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईसाठी ३ जेसीबी, ५ डंपर यासह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्री वापरण्यात आली, अशीही माहिती देवेंद्र जैन यांनी दिली आहे.