मुंबई : लोअर परळ येथील पुलाचे काम रेल्वे आणि महापालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे. या पुलाच्या पूर्वेकडील पाया रचण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पश्चिम बाजूकडील पाया भरण्याचे काम हवामानाचा अंदाज घेऊन केले जाणार आहे. या पुलाच्या कामाकरिता आणखी १० महिन्यांचा कालावधी लागणार असून, रेल्वेकडून या पुलाचे काम ३१ मार्च, २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
प्रभादेवी आाणि अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने ४५५ पुलांचे सुरक्षा आॅडिट केले होते. त्यामध्ये लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, जुलै, २०१८ मध्ये पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून पाडण्यात आला. महापालिका आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तरीत्या पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला.
नवीन पूल बांधण्यासाठी पश्चिम रेल्वेने लॉकडाऊन कालावधीचा उपयोग केला. फिजिकल डिस्टन्सिंग, सर्व नियमांचे पालन करून काम सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील भागातील पुलाचा पाया रचला. त्याआधी पूल निर्मितीसाइी मायक्रा पाइलिंगचे काम १४ नोव्हेंबर, २०१९ पासून आतापर्यंत सुरू आहे. ते पूर्ण होताच ४० दिवसांमध्ये आतील खोदकाम, पुलाचे काम सुरू होईल. यासाठी महापालिका आणि रेल्वे एकत्र निधी उपलब्ध करून देणार आहे.
या पुलाच्या कामाकरिता आणखी १० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, मार्च, २०२१ पर्यंत तो पूर्ण होईल. पुलाकरिता महापालिकेने रेल्वेला १२५ कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या कामासाठी ९३ अभियंता, पर्यवेक्षक, कामगारांच्या एका पथकाने १४ तासांत ६८५ क्युबिक मीटर सिमेंटीकरणाचे काम केले. पाया घालण्यासाठी ९२ मेट्रिक टन स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला. पश्चिम रेल्वेने पुलाच्या कामासाठी ८७ कोटींचे कंत्राट दिले आहे.
केवळ चार दिवसांत काम
लॉकडाऊन काळात लोकल आणि एक्स्प्रेस बंद असताना मध्य रेल्वेने पुलांच्या पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली. मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील ३३ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची क्षमता वाढविणे, जलवाहिनी वाढविण्यासह पुलांच्या पुनर्बांधणीचे काम या काळात करण्यात आले. कल्याण व शहाड स्थानकांदरम्यान वालधुनी नदी पुलावरील दोन्ही दिशेकडील मार्गावर जीर्ण झालेल्या स्टील गर्डरच्या जागी नवे स्लॅब टाकले. पनवेल-कर्जत दरम्यानच्या भागत आरसीसी बॉक्स टाकून पुलाचे पुनर्निर्माण ४ दिवसांत पूर्ण करण्यात आले. यासाठी सामान्य वाहतुकीच्या परिस्थितीत किमान २० दिवस लागले असते.