Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 11:34 AM2018-07-24T11:34:52+5:302018-07-24T12:45:44+5:30
लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले.
मुंबई - लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. आज सकाळपासूनच लोअर परेलचा पूल बंद ठेवण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेड्स लावण्यात आले असून पोलीसही तैनात आहेत. त्यामुळे पर्यायी पुलावरुन पादचाऱ्यांची वाहतूक सुरू आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा लोअर परेल पूल अचानक बंद करण्यात आल्याने पादचाऱ्यांची धांदल उडाली. सकाळी-सकाळीच कार्यालयात जाण्यासाठी घाईघाईत निघालेली ही मंडळी पूल बंद असल्याने अवाक झाली. तरीही वेळेत ऑफिस गाठण्यासाठी पुलावरची कसरत या कर्मचाऱ्यांना करावी लागली. त्यामुळे गर्दीत मार्ग काढताना सर्वांचीच दमछाक झाली. पण, यापूर्वी घडलेल्या पुल दुर्घटनांमधून आपण बरेच काही शिकलो आहोत असे भावच या पादचाऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत होते. त्यामुळेच गर्दीतही एक शिस्त आणि सावधानता बाळगताना पादचारी दिसत होते. कासवगतीने का होईना पण पुलावरुन मार्ग काढल्यानंतर अखेर हुश्शssss पोहोचलो बाबा एकदाचं असं म्हणत कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सकाळी 7 वाजल्यापासून लोअर परेल पूलावर पादचाऱ्यांची गर्दी सुरु झाली, ती गर्दी सकाळी 11 वाजेपर्यंत ही गर्दी तशीच होती.
सकाळी ऐन ऑफिस वेळेत अचानक पूल बंद झाल्याचे दिसून आल्यानंतर पादचाऱ्यांनी पर्यायी पूलावरुन चालायला सुरुवात केली
पुलाखालून मार्ग काढताना तेथे पार्कींग करण्यातआलेल्या वाहनांमुळेही पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
तोबा ही गर्दी, गर्दीतून मार्ग काढताना नक्कीच हे शब्द पादचारी आणि लोकल प्रवाशांच्या तोंडातून बाहेर पडले असतील.
पोलिसांनी लोअर परेल पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेड्स लावून वाहतूक बंद असल्याचे सूचित केले.
लोअर परेलचा पूल बंद असल्याने केवळ पादचाऱ्यांनाच नाही, तर चार चाकीतून प्रवास करणाऱ्यांनाही ट्रॅफीक जामचा फटका बसला आहे.
एलफिस्टन पूल दुर्घटनेमुळे लोअर परेल पुलावरुन जाताना पोलीस यंत्रणांसह नागरिकांनीही सतर्कता बाळगली होती.