लोअर परळ पूल : कोरोनाने दिला दणका; नागरिकांना वळसा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:08 AM2021-08-28T04:08:57+5:302021-08-28T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावरील लोअर परळ स्थानकालगत जुना रस्ते पूल जमीनदोस्त करून नवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावरील लोअर परळ स्थानकालगत जुना रस्ते पूल जमीनदोस्त करून नवा पूल उभारण्याच्या कामास आरंभ झाला. त्याला आजघडीला चार वर्षे झाली; मात्र आजही हा पूल पूर्णत्वास गेला नसल्याने स्थानिकांसह संपूर्ण मुंबईची परवड होत असून, या पुलाचे काम कधी मार्गी लागणार, असा सवाल आता मुंबईकर विचारत आहेत.
लालबाग, परळ, करीरोड आणि वरळी अशा चार ठिकाणांना जोडणारा लोअर परळ येथील पूल रेल्वेमार्गावरून जात असून, येथील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून लोअर परळ येथील जुना पूल जमीनदोस्त करण्यात आला. आणि या जागी नव्या पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या पुलाचे काम आजही वेगाने झालेले नाही. त्यात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा परिणामदेखील या कामावर झालेला आहे. कोरोनामुळे आहे त्या कामाचादेखील वेग मंदावला असून, काम धीम्या गतीने होत असल्याने स्थानिक नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत.
लोअर परळ, करीरोड, दादर आणि वरळी येथील नागरिकांशी लोअर पुलाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, चार वर्षे झाली या पुलाचे काम सुरू आहे. आजही काम हव्या त्या वेगाने सुरू नाही. शिवाय कामादरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण वेगळे आहे. करीरोडपासून लोअर परळच्या दिशेने काम सुरू असलेल्या पुलाखालील जुन्या पुलाचा भागदेखील अद्याप आहे तसाच आहे. शिवाय हे काम पूर्ण होईपर्यंत लगत राहणाऱ्या नागरिकांना मोठा वळसा मारावा लागत आहे.
करीरोड येथील नागरिकांना परळ पूर्व गाठण्यासाठी करीरोड पुलाने लालबागला उतरून पुढचा प्रवास करावा लागत आहे, तर पश्चिम बाजूसाठी चिंचपोकळी, महालक्ष्मी, वरळी नाका, लोअर परळ असा प्रवास करावा लागत आहे. उलट दिशेने पुन्हा हीच स्थिती असून, ऐन सकाळी आणि सायंकाळी महालक्ष्मी आणि लोअर परळ येथील वाहतूक कोंडी यात आणखी भर घालत आहे.
गेल्या दीड वर्षांत कोरोनाकाळात स्थलांतरित झालेले कामगार, कच्चा मालासह आवश्यक साहित्याची कमतरता, प्रशासकीय कामकाजात आलेले अडथळे, निर्णायक क्षमता आणि दिरंगाई अशा अनेक कामांचा फटका लोअर परळ पुलाला बसला असून, आता कोरोनाचे समूळ उच्चाटन होत असतानाच वेग पकडलेल्या कामामुळे लवकरच पुलाचे काम पूर्णत्वास जाईल आणि दक्षिण मध्य मुंबईतील प्रवास सुखकर होईल, असा आशावाद लगतच्या रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
---------------------
- १९२१ मध्ये ब्रिटिशकाळात बांधलेला लाेअर परळचा डिलाइल राेड पूल २४ जुलै २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
- लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवी, करी रोड, लालबाग आणि भायखळ्याकडे जाणाऱ्या मार्गांमधील हा पूल दुवा होता.
- लोअर परळ, करी रोड, वरळी तसेच पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची येथे प्रचंड गैरसोय हाेत आहे.
- पुलाचे बांधकाम एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता हा पूल खुला होण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आहे.
---------------------
कुठे किती पूल
महापालिकेच्या हद्दीत- ३१४
शहरात- ८१
पूर्व उपनगरात- ९०
पश्चिम उपनगरात- १४३
---------------------