- महेश चेमटे मुंबई - लोअर परळ पुलाच्या पाडकामात आता नवीन पेच निर्माण झाला आहे. पुलावरील केबल्स हटवून त्या रेल्वे रुळाखालून टाकण्यात येणार आहेत. याकरिता देखभाल-दुरुस्ती निधीची आवश्यकता असल्याचे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे. मात्र टेलिकॉम कंपन्यांनी निधी देण्यास नकार दिल्याने निधीअभावी लोअर परळ पूल पाडकाम लटकणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. शनिवार, १९ आॅगस्ट रोजी लोअर परळ पूल पाडकामास सुरुवात करण्यात आली. टप्प्याटप्प्याने पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने पुलाचे पाडकाम करण्याआधी केबल्स, तारा आणि बेस्ट थांबा हलविण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार पुलावरील बेस्ट बस थांबा हटविण्यात आला आहे. मात्र पुलामधून जाणाऱ्या टेलिकॉमसह अन्य के बल हटविण्यात आलेल्या नाहीत.खासगी कंपन्यांशी संपर्क साधून रेल्वे रुळाखालून केबल टाकण्याचा पर्याय देण्यात आला आहे. रेल्वे रुळांखालून केबल टाकण्यासाठी रेल्वेनियमांनुसार देशभरात विशिष्ट रक्कम आकारण्यात येते. लोअर परळ पुलामध्ये असलेल्या केबल कंपन्यांना यानुसार निधी पश्चिम रेल्वेकडे भरण्यास सांगितले आहे. मात्र खासगी टेलिकॉम कंपन्यांनी निधी देण्यास असमर्थता दर्शविल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. केबल्स हटविल्याशिवाय उर्वरित पाडकाम करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेचे अधिकारी खासगीत मान्य करीत आहेत. गोखले पुलाच्या दुर्घटनेत सुरक्षा आयुक्तांनी केबल्स, पेव्हरब्लॉकमुळे पूल कोसळल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट केले होते. यापूर्वी पूल उभारणीवरून पश्चिम रेल्वे आणि पालिकेत वाद होते. आता खासगी कंपन्यांशी वाद सुरू झाला आहे. तीन महिन्यांत पाडकाम आणि सात महिन्यांत पूल उभारणी अशा प्रकारे दहा महिन्यांत पूल उभारण्याचे आदेश असताना वादामुळे पूल पाडकाम लटकल्याचे दिसून येत आहे.
टेलिकॉम केबलमुळे लोअर परळ पुलाचे काम लटकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:20 AM