मुंबई - लोअर परळ येथील ९८ वर्षे जुना धोकादायक डिलाइल रोड पूल जमीनदोस्त करण्यात आला. या कामासाठी सुमारे ७.५ कोटी रुपये खर्च झाला. आता रेल्वे प्रशासनापुढे या जागी नवीन पूल उभारण्याचे आव्हान आहे. यासाठी ३१ जानेवारी रोजी पूल बांधकामाचे कंत्राट मंजूर झाले असून आता पूल बांधण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन पावले उचलणार आहे. लोअर परळ पूल बनण्यासाठी १० महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु रेल्वेला या कामासाठी १५ महिन्यांचा कालावधी लागेल.अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर आयआयटीसह रेल्वेच्या संयुक्त समितीने रेल्वे हद्दीतील ४५५ पुलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. यात ब्रिटिशकालीन डिलाइल रोड पूल गंजल्याचे समोर आले. त्यामुळे पश्चिम रेल्वेने पूल पाडला.लोअर परळ येथे ८५ मीटर बाय २७.५ मीटरचा स्टेलनेस स्टीलचा नवीन पूल उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाला १५ महिन्यांचा कालावधी लागेल. या कामासाठी १० महिन्यांची मुदत दिली होती. कामाचा कालावधी वाढल्याने मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पूल बांधण्यासाठी ८४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.२४ जुलै २०१८ रोजी लोअर परळ पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. २० आॅगस्ट २०१८ रोजी पुलाचे पाडकाम करण्यास सुरुवात झाली. डिसेंबर २०१८ रोजी पाडकामाचे ६० टक्के काम पूर्ण झाले. १ जानेवारी रोजी पाडकाम अंतिम टप्प्यात आले होते. २ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेऊन धोकादायक पूल जमीनदोस्त करण्यात आला.पुलाखाली सहा रेल्वे मार्गिकाएमयूटीपी टप्पा २ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका प्रस्तावित आहे. त्यामुळे लोअर परळ पुलाखाली पाचऐवजी सहा मार्गिका असतील, असा विचार करूनच पुढील काम करण्यात येईल.पुलाचे पाडकाम झाले आहे. आता पूल बांधण्यासाठी काम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट ३१ जानेवारी रोजी मंजूर झाले आहे. पूल उभारण्यासाठी १५ महिन्यांचा कालावधी लागणार असून ८४ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
लोअर परळ पुलाचे काम पूर्ण होण्यास १५ महिने लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 4:49 AM