Join us

लोअर परळचा नवीन पादचारी पूल मार्चपर्यंत; सर्व फलाटांना जोडणार, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पुलास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 5:46 AM

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर झालेल्या बैठकीत मंजुरी मिळालेल्या लोअर परळ स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर झालेल्या बैठकीत मंजुरी मिळालेल्या लोअर परळ स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. लोअर परळ स्थानकातील फलाट क्रमांक २च्या दादर दिशेवरील टोकावर पुलासाठी खांब उभारण्याचे काम सुरू असून, मार्च, २०१९ पर्यंत हा पूल प्रवाशांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे.लोअर परळ स्थानकाशेजारील डिलाईल पुलाला जोडणारा दादर दिशेकडील पूल पाडण्यात येईल. नवीन पादचारी पूल उभारणीनंतर दादर दिशेकडीले तिकीट खिडकी असलेला पूल पाडण्यात येईल. तिकीट खिडकी नवीन पादचारी पुलावर उभारण्यात येईल, तसेच नवीन पादचारी पूल हा पूर्व-पश्चिमसह सर्व फलाटांना जोडणारा असेल. हा पूल १० मीटर रुंद असून, ७० मीटर लांब असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाची रुंदी ४.५ मीटर आहे. फलाट क्रमांक २च्या दादर दिशेला पुलाच्या खांबासाठी काम सुरू आहे, तर लोअर परळ स्थानकाच्या पश्चिमेला पुलाच्या खांबाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.धोकादायक डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या पुलाचे पाडकाम सुरू आहे. पुलाच्या उभारणीसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून, पाडकाम झाल्यावर पूल उभारणीला तातडीने सुरुवात होईल, तर अंधेरी गोखले पुलावरील पादचारी भाग उभारण्याचे काम येत्या आठवड्यात सुरू होईल. महापालिकेने पूल उभारणीचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. मात्र, पैसे देण्याची महापालिकेने हमी दिल्यामुळे येत्या आठवड्यात पादचारी भाग उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

टॅग्स :मुंबई