Join us

लोअर परळ वर्कशॉप ‘शून्य भंगार’ म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 2:00 AM

पश्चिम रेल्वे विभागातील लोअर परळ वर्कशॉपमधील ७ हजार ४०० टनांचे भंगार विकण्यात आले आहे

मुंबई : पश्चिम रेल्वे विभागातील लोअर परळ वर्कशॉपमधील ७ हजार ४०० टनांचे भंगार विकण्यात आले आहे. त्यामुळे लोअर परळ वर्कशॉपला ‘शून्य भंगार’ वर्कशॉप म्हणून घोषित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेला भंगार विकून २२ कोटींचा महसूल मिळाला आहे. याआधी महालक्ष्मी रेल्वे वर्कशॉप भारतीय रेल्वेमधील पहिले ‘शून्य भंगार’ वर्कशॉप म्हणून घोषित करण्यात आले आहे.जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत लोअर परळ वर्कशॉपमधील ४ हजार ५०० टन लोहयुक्त धातूचे तुकडे, २०० टन इतर धातूचे तुकडे आणि २ हजार ७०० इतर भंगार जमा करण्यात आले. जमा करण्यात आलेले हे भंगार विकण्यात आले. यातून तब्बल २२ कोटी रुपयांचा महसूल पश्चिम रेल्वेला मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पश्चिम रेल्वे प्रशासनाला भंगारातून २६ कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे यंदा भंगारातून जादा महसूल मिळण्याचा विश्वास पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना आहे.पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी गुरुवारी लोअर परळ वर्कशॉपला भेट देऊन येथील सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यासह पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या ७५ उत्कृष्ट कोचचे उद्घाटनही करण्यात आले.