मुंबई : चलनात उच्च मूल्यांच्या नोटा कमी करण्याच्या मुद्द्यावर भारतीय नागरिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेवर धडक मोर्चा काढला. मात्र ही बाब सरकारच्या कार्यकक्षेत असल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक डॉ. दीपाली पंत जोशी यांनी हतबलता व्यक्त केली.१००, ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण ९५ टक्क्यांवर गेले आहे. परिणामी, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असून, ही बाब चिंताजनक असल्याचा भारतीय नागरिक संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे बँकेने टप्प्याटप्प्याने नोटांचे प्रमाण कमी करून धोरण स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली. अर्थक्रांती चळवळीचे अनिल बोकील यांनी अर्थक्रांतीच्या पाच प्रस्तावांचे सादरीकरण केले. यावर आधारित अर्थव्यवस्थेसाठी एक अर्थतज्ज्ञ या नात्याने गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करणारे लेखी निवेदन या वेळी देण्यात आले. जोशी यांनी नोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे मान्य केले, मात्र ही बाब सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. दरम्यान, ‘चलो आरबीआय जागरण मार्च’च्या वतीने चलनाविषयी जागरूकता निर्माण करणारी पत्रके वाटली.
उच्च मूल्यांच्या नोटांचे प्रमाण कमी व्हावे
By admin | Published: August 17, 2015 1:05 AM