देशाच्या आर्थिक राजधानीतील हवेचा दर्जा खालावला; मुंबईकरांचा नाताळ थंडीविना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 05:54 AM2019-12-25T05:54:04+5:302019-12-25T05:54:41+5:30

दिल्लीची हवा अत्यंत वाईट; बिझनेस हब म्हणून ओळखले जाणारे बीकेसी सर्वाधिक प्रदूषित

Lowered the air quality of the country's financial capital; Christmas without the chill | देशाच्या आर्थिक राजधानीतील हवेचा दर्जा खालावला; मुंबईकरांचा नाताळ थंडीविना

देशाच्या आर्थिक राजधानीतील हवेचा दर्जा खालावला; मुंबईकरांचा नाताळ थंडीविना

Next

मुंबई : थंडी नाही, पाऊस नाही आणि पुरेसे ऊनही नाही; अशा वातावरणाने मुंबईचे हवामान ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे देशाची राजधानी दिल्लीचा श्वास प्रदूषित वातावरणामुळे कोंडलेला असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईदेखील दिल्लीप्रमाणे प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी दिल्लीतील हवेचा दर्जा अत्यंत खालावल्याचे नोंदविण्यात आले असून, त्या खालोखाल मुंबईची हवादेखील बिघडल्याची नोंद आहे.

‘सफर’ या संकेतस्थळावर हवेचा दर्जा नोंदविण्यात येतो. डिसेंबर महिन्याचा विचार करता गेल्या २३ दिवसांत बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील हवेचा दर्जा अत्यंत खालावल्याचे निदर्शनास आले आहे. बीकेसी सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता कुलाबा आणि भांडुप येथील हवेचा दर्जा ठीक नोंदविण्यात आला.
कुलाबा मध्यम तर भांडुप येथील हवेचा दर्जा समाधानकारक असून, बोरीवली, मालाड, अंधेरी, वरळी, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा पूर्णत: घसरल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईमधील बीकेसी येथील हवेचा दर्जा अत्यंत वाईट असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.

धुके, धूळ आणि धूर यांच्या मिश्रणामुळे धूरक्यात वाढ होत असून, मंगळवारी मुंबईच्या हवेचा दर्जा खालावल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. बीकेसीचे हवामान सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आले असून, त्याखालोखाल माझगावसह वरळीचा समावेश आहे. अशीच काहीशी प्रदूषके मरिन ड्राइव्हच्या किनारी नोंदविण्यात आली असून, त्यामुळे येथील परिसर धूसर झाल्याचे चित्र होते.

मुंबईतील हवेचा दर्जा

बीकेसी - ३०२ (अत्यंत वाईट)
बोरीवली - २०९ (वाईट)
मालाड - २७३ (वाईट)
भांडुप - ७७ (समाधानकारक)
अंधेरी - २६१ (वाईट)
चेंबूर - २०८ (वाईट)
वरळी - २१६ (वाईट)
माझगाव - २१७ वाईट
कुलाबा - १९२ मध्यम
नवी मुंबई - २१६ वाईट

तीन दिवस पावसाचे
२५ ते २६ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
२७ डिसेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
२५ आणि २६ डिसेंबर : मुंबईत आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशाच्या आसपास राहील.

गोंदियात सर्वांत कमी १४.४ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान
राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १४.४ अंश सेल्सिअस, तर मुंबईचे किमान तापमान २३ नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

वाहन, कारखान्यांमुळे हवा प्रदूषित
च्मुंबईतच दररोज ५००हून जास्त नव्या वाहनांची भर पडत असून, याव्यतिरिक्त छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सोडले जाणारे वायू हवा प्रदूषित करीत आहेत.
च्मुंबई शहरात माझगाव, पूर्व उपनगरात चेंबूर आणि पश्चिम उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुलाला लागून अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणाची नोंद होत आहे.
च्सुरू असलेली बांधकामे, कारखाने, खाणकामे हे घटक हवेतील धूलिकणांमध्ये भर घालतात.
च्‘सफर’ संकेतस्थळावरील नोंदीनुसार, १ ते २२ डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले होते.
च्वांद्रे-कुर्ला संकुलाचा विचार करता या काळात बीकेसीमधील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले; आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले.

Web Title: Lowered the air quality of the country's financial capital; Christmas without the chill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.