मुंबई - लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील ना. म. जोशी मार्गावरील पूल दुरुस्तीसाठी कालपासून बंद करण्यात आला. त्यामुळे हा पूल पूर्णतः: वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाश्यांना या पुलाखालील डावीकडे असलेला दत्ता अहिरे मार्ग हा पर्यायी मार्ग म्हणून देण्यात आला आहे. लोअर परळ रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अगोदरपासूनच हा चिंचोळ्या रस्त्याच्या वापर केला जात होता. मात्र, या चिंचोळ्या मार्गाला लागूनच असलेली भिंत जीर्ण झाली असून तेथे कोणत्याही क्षणी भिंत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. हा अपघात घडण्याआधीच रेल्वे प्रशासनाने योग्य ती पावलं उचलावी. कारण या मार्गावरील वर्दळ कालपासून वाढली आहे.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात काल सकाळी ६ वाजल्यापासून लोअर परळचा पूल वाहतूक, पादचाऱ्यांसाठी बंद झाल्याने लोअर परळ, करी रोड रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना तसेच स्थानिकांनाही त्रासास सामोरे जावे लागत आहे. एल्फिन्स्टन स्थानकासारखाच धोका पर्यायी मार्ग निवडलेल्या मार्गावर निर्माण झाला होता. नवा पूल तयार होईपर्यंत पुढील कित्येक महिने नागरिकांना याच त्रासास सामोरे जावे लागणार आहे. लोअर परळ, करी रोड स्थानक, परळ वर्कशॉप आदी पट्ट्यास जोडणारा हा पूल सुमारे १०० वर्षांपासून कार्यान्वित होता. पण पुलांच्या संयुक्त सुरक्षा आढाव्यात हा पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा देण्यात आल्यानंतर तातडीने तो काल बंद करण्यात आला. मात्र, सक्षम पर्यायी उपाययोजना नसल्याने मंगळवार सकाळपासूनच परिसरात मोठी गर्दी उसळली होती. लोअर परळ, करी रोड स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंमध्ये असल्याने कार्यालयांच्या वेळेदरम्यान इथे प्रचंड गर्दी असते. आजपासून लोअर परळ रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पुलाची भिंत तोडण्याचे काम सुरु झाले. त्यादरम्यान कोणताही घातपात होऊ नये म्हणून दत्ता अहिरे मार्गावरील बंद असलेल्या बांधकाम साईटची जागा खुली करून तेथून लोकांना जाण्यासाठी जागा दिली आहे. या मार्गावरून लोअर परळच्या चिंचोळ्या गल्लीतून बाहेर पडून रेल्वे स्थानकावरील तिकीट घराकडे पोहचू शकतो. इतकी कसरत नागरिकांना सध्या करावी लागत आहे. मात्र, हि कसरत सुरक्षित नसून धोकादायक असल्याचे मनसेचे शाखाध्यक्ष मारुती दळवी यांनी सांगितले. या चिंचोळ्या गल्लीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कालपासून वाढली आहे. त्यामुळे याठिकाणी चेंगराचेंगरी तर होऊ शकतेच तसेच या रस्त्याला लागून असलेली भिंत जीर्ण झाली आहे. ती धोकादायक आहे. रेल्वे प्रशासनाला आणि पालिकेला आम्ही नागरिकांची सुरक्षित सोया करून देण्यासाठी विनंती केली असल्याचं दळवी यांनी सांगितलं. या चिंचोळ्या मार्गावर जर चेंगराचेंगरी झाली तर पळायला रस्ता नाही आहे. आजूबाजूला लोखंडी सामान आहे. भिंती पलीकडे रेल्वेचे सामान आहे तर अनधिकृत बांधकामं हटवून नागरिकांना मोकळा रास्ता उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिला व पुरुषांसाठी दोरखंड टाकून दोन वेगळे मार्ग असावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे दळवी यांनी पुढे सांगितले.