मुंबई : मुंबईत जानेवारीत वाहतूक उल्लंघन करणाऱ्यांपैकी केवळ ११ टक्के जणांनी ई-चलन भरले आहे. तर उर्वरित ८९ टक्के जणांचे ई-चलन भरणे बाकी आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, ४.९२ लाख रुपयांचे ई-चलन आकारण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ५३,३३८ ई-चलन भरण्यात आले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दंड वसूल करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यांनी २३ टक्क्यांहून अधिक रक्कम गोळा केली असून, या वर्षाच्या अखेरीस किमान ६० टक्के रक्कम गोळा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, विविध वाहतूक नियम उल्लंघनांसाठी जारी करण्यात आलेल्या १०५ कोटींच्या ई-चलनपैकी ८३ कोटींची म्हणजेच ७८ टक्क्यांहून अधिक रक्कम अद्याप वसूल करण्यात आलेली नाही. ओव्हरटेक केल्याप्रकरणी ६.९२ लाख किमतीच्या एकूण ३,४६० ई-चलनपैकी केवळ ९१,२०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.
तर ई-चलन वसुलीचे प्रमाण सुधारण्यासाठी एमटीपी प्रयत्नशील असतानाच राज्य महामार्ग पोलिसांच्याही वसुलीचे प्रमाण कमी आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महामार्ग पोलिसांनी उल्लंघन करणाऱ्यांना १ लाख ५७ हजारांहून अधिक ई-चलन जारी केले असून, त्यापैकी केवळ १९ हजार २५९ लोकांनी दंड भरला आहे.
ई-चलन दंड वसुलीला गती देण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता रोखीने दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. १.६४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ६०२ कोटींच्या थकीत ई-चलनपैकी ४० टक्क्यांहून अधिक ई-चलन मुंबईचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. डिजिटल पेमेंटमुळे वसुलीवर वाईट परिणाम झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. रोख देयके पुन्हा सुरू झाल्यामुळे वसुलीचे प्रमाण किंचित वाढले आहे, असेही महामार्ग पोलिसांनी सांगितले.