शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘निष्ठा’; राज्यात होणार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 02:51 AM2019-12-01T02:51:12+5:302019-12-01T02:51:48+5:30
प्रशिक्षण तालुका आणि राज्य अशा दोन स्तरांवर देण्यात येईल. जि
मुंबई : शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘निष्ठा’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभर होत असून, आता राज्यात या कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाच्या सूचना प्राथमिक संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरणे, मुंबईचे सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांमधील पहिली ते आठवीत शिकविणारे शिक्षक व अशा शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती यांच्यासाठी या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण तालुका आणि राज्य अशा दोन स्तरांवर देण्यात येईल. जिल्हा स्तरावरून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची असेल. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या लक्षात घेऊन तालुकानिहाय ५ तज्ज्ञ मार्गदर्शकांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. मात्र, यातील प्रत्येक व्यक्ती मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांतील तज्ज्ञ असणे गरजेचे आहे, तसेच यातील किमान २ व्यक्ती तंत्रस्नेही असाव्यात, असे प्राथमिक संचालनालयाकडून नमूद करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर तालुकास्तरीय प्रशिक्षणाची जबाबदारी शाळांचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची असेल. त्यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी इंटरनेट सुविधा, प्रोजेक्टर, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह यांची योग्य व्यवस्थाही संस्थांनी करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
इतर प्रशिक्षण न देण्याचे निर्देश
विशेष म्हणजे, या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरावरून इतर कोणतेही प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम म्हणजे केंद्र सरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रम असून, याचा दैनंदिन तपशील उपस्थिती, पूर्व व उत्तर चाचणी, नियोजन यांचा अहवाल केंद्र शासनाला शाळांनी व संस्थांनी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.