मुंबई - शिवसेना नेते आणि बंडखोरीनंतर मराठवाड्यात शिवसेनेची तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अंबादास दानवेंनी शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेची निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निवडचे पत्र दानवे यांना दिले. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यातूनच, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या पडत्या काळात मराठवाड्यातून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी खिंड लढवली. त्यामुळेच, अंबादास दानवेंना पक्षाने ही बढती दिल्याचे दिसून येत आहे.
ज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेने दावा सांगितलेला होता. उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र लिहित अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी शिफारस केली होती. त्यानुसार, आज अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे याच मराठवाड्याला शिंदेंच्या मंत्रिमंडळातही मोठं स्थान मिळालं आहे. त्यातच, औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेच ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. तसेच, दानवेंना विरोधी पक्षनेते पद देऊन उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना इशाराच दिला आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते मिळावं यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, मनीषा कायंदे इच्छुक होत्या. अंबादास दानवे यांचा आक्रमक स्वभाव आणि फर्डी भाषणकला तसेच त्यांचं विधान परिषदेतील काम लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली आहे.