मुंबई - शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकताच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात जिकडे-तिकडे याचीच चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही धनुष्यबाणाचीच चर्चा रंगली आहे. शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर, महाविकास आघाडीतील नेतेही भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन शिवसेनेचं समर्थन केलं आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे नेते आपली बाजू मांडत आहेत. तर, महाविकास आघाडीतील नेते शिवसेनेच्या बाजूने भूमिका घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन शिवसेना चिन्ह गोठवल्यानंतर आपलं मत मांडलं आहे. 'लोकांच्या मनताील निष्ठा गोठवता येणार नाही'', असे म्हणत पवार यांनी ठाकरे यांना समर्थन दर्शवलं आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही. दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल, असे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचं समर्थनच केलं आहे.
शिवसेनेवर शालिनी ठाकरे यांची टीका
दरम्यान, यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे. “जुलै महिन्यात केलेली भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे. उद्याच्या वर्तमानपत्रात जाहिरात आली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. धनुष्यबाण डोहाळे जेवणसाठी भाड्याने देणे आहे...!” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकेचा बाण सोडला आहे.
संदीप देशपांडे यांचीही टीका
“संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नमः” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे. जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब, भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे. ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल.” असंह मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.