'शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य'; रोहित पवारांनी पाहिल्या दोन्ही सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:29 AM2022-10-06T10:29:42+5:302022-10-06T10:32:31+5:30
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर महाविकास आघाडीतून टीका होऊ लागली आहे.
मुंबई - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. आता, दोन्ही नेत्यांच्या भाषणावर इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसेकडून दोन्ही भाषणांवर टीका करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी शिवाजी पार्कवरील भाषणाचं कौतुक करत अखेर निष्ठेचा विजय झाल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर महाविकास आघाडीतून टीका होऊ लागली आहे. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेवर पलटवार करण्यात येत आहे. सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट आणि बापाच्या नावाने थापा, या शब्दांत भाजपकडून प्रतुत्तर देण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणाचं भाषणं लांबलं असे म्हणत जनतेनंच ते ठरवावा, असाही टोला लगावला. तर, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, शेवटी निष्ठा जिंकली... असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं समर्थन केलं आहे.
कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही,माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो, परंतु सामान्य कार्यकर्ते, जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो, याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.
मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते ,जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 6, 2022
उद्धव ठाकरेंकडून भाजपवर टीका
उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून शिवसैनिकांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अमित शाहांवर पुन्हा तोफ डागली. पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.