मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचे कंत्राट जीव्हीकेने एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचे जाहीर केले आहे.जीव्हीकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये याबाबत माहिती दिली आहे. विमानतळाच्या आगमन व निर्गमन कक्ष, एअरफिल्ड विकास, इंजिनीअरिंगचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. यामध्ये ३८०० मीटर लांबीची धावपट्टी, एप्रॅन, टॅक्सीवे, ग्राउंड लायटिंग, अंतर्गत रस्ते, वाहन पार्किंग व इतर सुविधा तयार करण्याच्या कामाचा समावेश आहे. प्रवासी टर्मिनल इमारतीचे डिझाइन ब्रिटिश इराकी आर्किटेक्ट जाहा हदिद आर्किटेक्टने तयार केले आहे. याद्वारे सुरुवातीला प्रतिवर्षी १ कोटी प्रवासी प्रवास करू शकतील या पद्धतीने तयार करण्यात येत आहे. कालांतराने दरवर्षी २ कोटी प्रवाशांची वाहतूक करू शकतील अशा पद्धतीने विकसित करण्यात येत आहे.
याबाबत एल अॅण्ड टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस.एन. सुब्रह्मण्यम म्हणाले, मुंबई शहराला दुसऱ्या विमानतळाची मोठी गरज असून या प्रतिष्ठेच्या कामासाठी आमची निवड झाल्याचा आम्हाला आनंद आहे. जीव्हीकेचे अध्यक्ष डॉ. जीव्हीके रेड्डी म्हणाले, एल अॅण्ड टीसोबत काम करण्यास आम्हाला आनंद वाटत आहे. यापूर्वीदेखील आम्ही सोबत काम केले असून उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.