Join us

‘लकी ड्रॉ’चे बक्षीस विद्यार्थ्याला पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:55 AM

लकी ड्रॉमध्ये साडेसात लाखांचे बक्षीस लागल्याचे सांगून महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून २२ हजार ५०० रुपये उकळल्याची धक्कादायक घटना भोईवाडामध्ये उघडकीस आली.

मुंबई : लकी ड्रॉमध्ये साडेसात लाखांचे बक्षीस लागल्याचे सांगून महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून २२ हजार ५०० रुपये उकळल्याची धक्कादायक घटना भोईवाडामध्ये उघडकीस आली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.तक्रारदार भावेश (२०) हा कुटुंबीयांसोबत परळमध्ये राहतो. तो स्नॅपडीलवरून आॅनलाइन वस्तू खरेदी करतो. याच दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने त्याला कॉल करून साडेसात लाखांचे बक्षीस लागल्याचे सांगितले. सुरुवातीला भावेशने त्याकडे दुर्लक्ष करीत फोन ठेवून दिला. त्यानंतरही चार ते पाच वेळा संबंधित व्यक्तीने कॉल करून पैसे पाठविण्यासाठी खाते तपशिलाची मागणी केली. पुढे भावेशने गुगलच्या माध्यमातून स्नॅपडीलच्या शुल्क विभागाचा नंबर शोधला. मिळालेल्या नंबरवर त्याने कॉल करीत आलेल्या फोनबाबत विचारणा केली. संबंधितानेही तेच सांगितल्याने त्याचा विश्वास बसला. त्याने संबंधित कॉलधारकाकडे माहिती देण्यास सुरुवात केली. तेव्हा, सुरुवातीला जीएसटीसाठी २२,५०० रुपये उकळले. पुढे आणखी पैशांची मागणी सुरू झाल्याने त्याला संशय आला. त्याने आधीची रक्कम परत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर कॉलधारक नॉट रिचेबल झाला. यात, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भावेशने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.