लुधियाना ९.१, मुंबई २२.२ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 03:53 AM2019-11-22T03:53:07+5:302019-11-22T03:53:23+5:30
शीत लहर मध्य भारतापर्यंत दाखल; देशातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात घट
मुंबई : देशातील बहुतांशी शहरांच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असून, तापमान घटण्याची सुरुवात पंजाबपासून झाली असून, मध्य भारतापर्यंत पोहोचली आहे. गुरुवारी लुधियानाचे किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, महाराष्ट्रात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे १४.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मुंबईत मात्र म्हणावी तशी थंडी सुरू झालेली नाही.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा विचार करता गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
कोकण, गोव्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३५, २३ अंशाच्या आसपास राहील.
उत्तर भारत गारठतोय
सूर्याचे दक्षिणायन सुरू होत असून, उत्तर भारतातील पर्वतरांगांत हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे शीत वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतातील तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. आता पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, झारखंड आणि बिहारपर्यंत शीत वारे वाहत असल्याने हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत. परिणामी, तापमान खाली घसरत आहे.
राज्यातील बहुतांशी शहरांचे गुरुवारचे किमान तापमान १६ अंशांवर
पुणे १७.४
अहमदनगर १४.६
जळगाव १६.६
महाबळेश्वर १६
मालेगाव १६.५
नाशिक १५.८
सातारा २०.८
सोलापूर २०.९
औरंगाबाद १६.९
नांदेड १६.५
अकोला १६
अमरावती १६.२
बुलडाणा १७
चंद्रपूर १८.२
गोंदिया १५.५
नागपूर १५.१
वाशिम १६
वर्धा १७.४
यवतमाळ १५.४
थंड वातावरण असलेली देशातील शहरे
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
पंजाब/लुधियाना ९.१
पंजाब/अमृतसर ९.४
हरयाणा/करनाल ९.८
राजस्थान/सीकर १०
पंजाब/पटीयाला १०.१
हरयाणा/अंबाला १०.२
हरयाणा/हिसार १०.२
यूपी/बरेली १०.५
यूपी/मेरठ १०.६
हरयाणा/नारनौल १०.६