लम्पी आजाराच्या विषाणूचे करणार जनुकीय परीक्षण
By स्नेहा मोरे | Published: October 8, 2022 07:58 PM2022-10-08T19:58:01+5:302022-10-08T19:58:51+5:30
लसीकरण पूर्व आणि नंतरचे नमुने बंगळुरूला पाठविणार
स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई: लम्पी आजाराच्या विषाणूच्या जनुकीय परिक्षणांतर्गत तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होणार आहे. तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने सात विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणाकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बंगळुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था येथे पाठविण्यात येणार असल्याची पशुसंवर्धन आय़ुक्तालयाने सांगितले.
राज्यामध्ये आतापर्यंत ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी एकूण ३३ हजार ६७५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 115.18 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 82.32 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.
नुकसान भरपाईचे नियम शिथिल
नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा (जनावराचा) मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. यापुर्वी लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जास्तीत जास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार आहे.