मांद्य चंद्रग्रहणाचे भारतातून पाच जूनला घेता येणार दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:57 AM2020-05-21T03:57:23+5:302020-05-21T07:16:20+5:30
यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण १० जानेवारीला झाले. त्यानंतरची तिन्ही चंद्रग्रहणे छायाकल्प किंवा मांद्य याच प्रकारची असतील.
मुंबई : २०२० या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण ५ जून २०२० होणार असून ते मांद्य किंवा छायाकल्प प्रकारचे आहे. या चंद्रग्रहणावेळी चंद्र लालसर तांबूस (ब्लडमून) दिसतो. हे ग्रहण भारतातून दिसेल. खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी आहे.
यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण १० जानेवारीला झाले. त्यानंतरची तिन्ही चंद्रग्रहणे छायाकल्प किंवा मांद्य याच प्रकारची असतील. ५ जूनचे चंद्रग्रहण भारतातून दिसेल, तर ५ जुलैचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२० रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसेल.
भौतिकशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, पृथ्वी ही
सूर्य व चंद्राच्या मध्ये येते व तिघे साधारणत: एका रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीच्या चंद्रावर पडणाऱ्या सावलीमुळे चंद्र किंवा चंद्राचा
काही भाग झाकला जातो. या सावलीमुळे चंद्राच्या पौर्णिमेला दिसणाºया स्थितीला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व
सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा
ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ
५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावास्येला ग्रहण होत नाही. एका वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणे होऊ शकतात. यातील ४ ते ५ सूर्यग्रहणे, तर
उरलेली चंद्रग्रहणे असतात. एका वर्षात कमीत कमी दोन ग्रहणे होतातच. मात्र, त्यावेळी ही दोन्ही ग्रहणे सूर्यग्रहण असतात. चंद्रग्रहणाच्या तुलनेत सूर्यग्रहणे संख्येने अधिक असतात.
चंद्रग्रहण पृथ्वीच्या अर्ध्या भागावरून दिसते. सूर्यग्रहण पृथ्वीच्या फारच कमी भागावरून दिसते. त्यामुळे चंद्रग्रहण पाहिलेले लोक जास्त, तर सूर्यग्रहण पाहिलेले लोक कमी आहेत, असेही जोहरे यांनी सांगितले.
मांद्य चंद्रग्रहण म्हणजे काय?
चंद्रग्रहण खंडग्रास आणि खग्रास अशा दोन प्रकारचे असते. चंद्र शंभर टक्के झाकला जातो, त्याला खग्रास, तर चंद्र ९० टक्क्यापर्यंत झाकला जातो त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. चंद्र विरळ छायेमधून जाणार असल्यास अशा ग्रहणाला मांद्य किंवा छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणत असल्याची माहिती भौतिकशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.