लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेमध्ये कमालीचा बदल झाला असून, एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अवस्था अतिशय वाईट पाहण्यास मिळत आहे. रुग्णांची फुफ्फुसे पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला.
छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या काेराेना रुग्णांच्या फुफ्फुसात हळूहळू बदल दिसून येत होता. मात्र, आता फुफ्फुस लवकर खराब होत आहे. ते खराब झाल्यावर रुग्ण उपचारासाठी येत आहेत. अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे अवघड होत आहे. एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. यातील बहुतेक वृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.
* तज्ज्ञांच्या मते लक्षणांकडे केले जाते दुर्लक्ष
- ताप, सर्दी, घशात खवखव ही लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत आहेत.
- मात्र, अजूनही लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
- अनेक जण विनामास्क रस्त्यांवर फिरत आहेत. या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा फैलाव वाढत आहे.
- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय आणि किडनीचे विकार असणाऱ्या रुग्णांना या विकाराचा धोका सर्वाधिक आहे.
* ज्येष्ठांमध्ये फुफ्फुस खराब हाेण्याचा टक्का अधिक
- श्वसनप्रक्रियेत हवेचा उपयोग करणाऱ्या व त्यात महत्त्वाचा भाग घेणाऱ्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांतील अंतस्त्याला (शरीरांतर्गत पोकळीतील इंद्रियाला) फुप्फुस म्हणतात. मानवात वक्षीय पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक अशी दोन फुप्फुसे असतात. जन्मतः फुप्फुस गुलाबी रंगाचे असते, कारण त्यात पुष्कळ रक्तवाहिन्या विखुरलेल्या असतात. प्रौढावस्थेत हा रंग स्लेटच्या पाटीप्रमाणे गडद काळपट बनतो. वाढत्या वयाबरोबर तो अधिक गडद होत जातो.
- ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. त्यांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असून, हे प्रमाण ४० टक्के आहे. या रुग्णांमध्ये फुफ्फुस खराब हाेऊन पांढरी होण्याचा टक्का अधिक आहे. मुळात हे रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल होत असून, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने समस्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- दिवसाला जर १०० रुग्ण एखाद्या रुग्णालयात दाखल होत असतील तर त्यापैकी ३० रुग्ण असे असतात ज्यांची फुफ्फुसे खराब अथवा पांढरी झालेली असतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
------------------------