लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुर्मीळ नाण्यांच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी खार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एकाला बुधवारी पोलिसांनी अटक केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
आमिर याकूब शेख (वय ३०) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, ज्याच्या मुसक्या मुंबई सेंट्रल परिसरातून पोलिसांनी आवळल्या. या टोळीचा म्होरक्या इसा अहमद खान हा ब्रिटिश नागरिक आहे. ज्याने EA Rarcoa Collectibles Private Limited नावाची कंपनी मुंबई व बंगळुरू परिसरात उघडून त्यात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे आमिष दाखविले. सुरुवातीला काहींना त्याने दुप्पट पैसे दिले. मात्र, नंतर गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने कंपनीच्या यु बी सीटी, बंगळुरू व कर्नाटक कार्यालयात जाऊन कॉइनच्या डिझाईन बनविणाऱ्या डाय, कंपनीचे ब्रोशर्स, व्हीझिटिंग कार्ड्स व ९१७ दुर्मीळ कॉईन हस्तगत केले. तसेच त्याच्या सहा बँक खात्यातील १ कोटी ११ लाख ४७ हजार ९९ रुपये गोठविण्यात आले. अटक आरोपी शेख याने खानला भेंडी बाजारातून जुने काॅईन्स विकत घेण्यास मदत केली आणि स्वतः देखील इलियाना मार्केटिंग कंपनी स्थापन करून जवळपास दोन कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून जमा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, त्याला न्यायालयाने ११ जानेवारी २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.