लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सीएच्या विद्यार्थ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तरुणाची ९६ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.
मस्जिद बंदर परिसरात ३० वर्षीय तरुण कुटुंबीयासोबत राहण्यास आहे. तो सी.ए.चे शिक्षण घेत आहे. त्याने नोकरी डाॅट काॅमवर नोकरीसाठी अर्ज केला. काही दिवसाने नोकरी डाॅट काॅमवरून बोलत असल्याचे सांगून एकाने कॉल केला. कॅनडातील आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागल्याचे सांगितले. तसेच प्रोसेसिंग फीच्या नावाखाली साडेतीन हजार रुपये भरण्यास सांगितले. तरुणाने विश्वास ठेवून पेटीएमद्वारे पैसे पाठविले. पुढे वेगवगेळी कारणे पुढे करीत २९ ऑक्टोबर २०२० ते २७ जून दरम्यान तरुणांकड़ून ९३ हजार ५०० रुपये उकळले. पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने तरुणाने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तरुणाने रविवारी पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवीत अधिक तपास सुरू केला आहे.