वृद्धाकडून लाखो रुपये उकळले; दुकलीला दिल्लीतून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वृद्धाशी फेसबुकवर मैत्री करत त्यांच्या नावाने ते राहत असलेल्या परिसरात लसीकरण करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी दोघा भामट्यांना पवई पोलिसांनी दिल्लीतून नुकतीच अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांना आरोपींनी काही दिवसांपूर्वी ‘फेसबुक’वर रिक्वेस्ट पाठवत त्यांच्याशी मैत्री केली. ते एका एनजीओचे प्रतिनिधी आहेत, अशी ओळख करून दिली होती. त्यांच्यात मैत्री वाढल्यानंतर तक्रारदार राहत असलेल्या परिसरात लसीकरण करण्याचा प्रस्ताव टोळक्याने त्यांच्यासमोर ठेवला. त्यासाठी काही रकमेची मागणी केली. सदर लसीकरण हे तक्रारदाराच्या नावाने करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन २० लाख रुपये पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात लसीकरण केलेच नाही. तसेच पैसे मिळाल्यानंतर त्यांना संपर्कही केला नाही. त्यामुळे तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी पवई पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पवई पोलिसांनी याप्रकरणी दोघांना दिल्लीतून अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांना विचारले असता, आरोपींना रिमांडसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले.
* चांगल्या कामासाठी भेटवस्तू देत फसवणूक!
काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लसीकरणासाठी पैसे देऊन सामाजिक काम केले आहे आणि त्यासाठी त्यांना एक भेटवस्तू एनजीओकडून दिली जात आहे, असेही त्यांनी तक्रारदाराला सांगितले. ही भेटवस्तू त्यांना दिल्ली विमानतळावर दिली जाईल, असे सांगत याबाबतही त्यांना चुना लावल्याची माहिती असून अद्याप या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
..........................................................................................................................