Join us

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष अन् थेट रशिया-युक्रेन युद्धात तैनात; CBI कडून मानवी तस्करीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त 

By मनीषा म्हात्रे | Published: March 08, 2024 7:55 AM

७ शहरांमध्ये १० हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन

मुंबई : सीबीआयने परदेशात चांगल्या पगाराची नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन, तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या मानवी तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून कार्यरत आहेत. भारतीय नागरिकांना युट्युब तसेच अन्य सोशल मीडियाद्वारे त्यांच्या स्थानिक संपर्क/एजंटद्वारे रशियामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवायचे. त्यानंतर, तस्करी झालेल्या भारतीय नागरिकांना प्रशिक्षण देत त्यांना जबरदस्तीने रशिया - युक्रेन युद्ध क्षेत्रामध्ये तैनात करत असल्याचा धक्का दायक प्रकार कारवाईतून समोर आला आहे. युद्धक्षेत्रात काहीचा बळी तर काही जण गंभीर जखमी झाल्याचेही आढळून आले आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी खाजगी व्हिसा कन्सल्टन्सी फर्म आणि एजंटसह इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल नोंदवला. ही मंडळी चांगला रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली  रशियाला भारतीय नागरिकांची तस्करी करत होते. या एजंट मानवी तस्करीचे जाळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे.

सीबीआयने दिल्ली, त्रिवेंद्रम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे जवळपास १३ ठिकाणी एकाचवेळी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंत रोख रक्कम ५० लाख, लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप, सीसीटीव्ही फुटेज आदी गुन्ह्यांची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच काही संशयितांना विविध ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या पीडितांच्या जवळपास ३५ घटना समोर आल्या आहेत. तस्करीच्या अधिक बळींचीही ओळख पटवली जात आहे. तपास सुरू आहे. संशयास्पद रिक्रूटमेंट एजन्सी आणि एजंट्सच्या नोकऱ्यांच्या अशा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन सीबीआय कडून करण्यात आले आहे. 

यांच्यावर कारवाई....सीबीआयने एम एस २४*७ रास ओव्हरसिज फाऊंडेशन के जी मार्ग, दिल्लीचा संचालक सुयश मुकुट, मुंबईच्या एम एस ओ. एस. डी ब्रॉस त्रव्हेल आणि व्हिसा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक राकेश पांडे आणि पंजाबमधील अद्व्हेंचर कंपनीचा संचालक मनजीत सिंगसह बाबा ओव्हरसिज रीकृटमेंट सोल्यूशन दुबईचा संचालक फैसल अब्दुल मुटालिब खा्न उर्फ बाबा विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभागगुन्हेगारीयुक्रेन आणि रशिया