मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यात नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले. आपल्या ७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटींचे धान्य आधारभूत किमतीवर खरेदी केले. आम्ही एवढ्याच वर्षांत साडेतेरा लाख कोटींची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे दिले, अशी तुलना करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. आता, या टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतेही मोदींसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पलटवार करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मोदींनी शरद पवार यांचे नाव न घेता, शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषीमंत्री असताना काहीही केलं नसल्याचं मोदींनी म्हटलं. मोदींच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींचा जुना व्हिडिओ ट्विट करत त्यांनीच शरद पवारांच्या कृषी योगदानाबद्दल केलेल्या कौतुकाची आठवण करुन दिली. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं.
खालील व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं की, PM साहेबांना आपण आधी काय बोललो आहोत हे लक्षात राहत नसाव. असो, पण हे विधान करत असताना आमचे काही जुने साथीदार मंचावर बसले होते. पक्ष फुटीच्या आधी हीच लोक, पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून" आमदार,मंत्री झालेत. तीच लोक आज केवळ सत्तेच्या लालसेपोटी,बघ्याच्या भूमिकेत राहून गप्प बसली,हे पाहून वाईट वाटलं,दुःख झालं, असे म्हणत आव्हाड यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. कारण, अजित पवार हे त्यावेळी व्यासपीठावर होते.
बाकी शेतकऱ्यांच्याबाबत मोदी साहेबांनी बोलावं, हा देखील मोठा विनोद आहे. वर्षभर शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत ठाण मांडून बसला होता. ७५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा या दरम्यान जीव गेलाय. दुसरीकडे आमच्या बापाने या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यासाठी केली होती, असे म्हणत मोदींच्या टीकेवरही आव्हाडांनी पलटवार केला आहे.
काँग्रेसवरही मोदींची टीका
तुम्ही यापूर्वी केवळ घोटाळ्यांचे आकडे ऐकले. आम्ही विकास निधींचे आकडे ऐकवितो. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना तरसावले. १९७० मध्ये मान्यता मिळालेल्या निळवंडे धरणाचे आज लोकार्पण झाले. आमच्या सरकारने गती दिल्याने हे शक्य झाले. महाराष्ट्रातील कृषिमंत्र्यांच्या काळात शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. आम्ही एमएसपी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले, असेही ते म्हणाले.