मुंबई : धारावीत निवृत्त शिक्षक प्रभाकर माचा यांच्या आत्महत्येला नवे वळण येत आहे. प्राथमिक तपासात त्यांनी पत्नीच्या विरहातून हे पाऊल उचलल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पण राज्य एटीएसने अटक केलेल्या नक्षलवाद्यांशी कनेक्शन आहे का, याच्या पडताळणीसाठी माचा यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच त्यांच्या घराची झाडाझडतीही घेण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.राज्य दहशतवादविरोधी पथकाने ७ नक्षलवाद्यांना बेड्या ठोकल्यानंतर अन्य साथीदारांचा शोध सुरू केला. मुंबईतील त्यांच्या कनेक्शनबाबत चौकशी सुरू केली. महाराष्ट्रासह गुजरातच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये गोल्डन कॉरीडोर बनवून या माध्यमातून संघटनेसाठी काम करणारा तरुणवर्ग आणि फंडिंग गोळा करण्याचे काम हे सातही जण अजय दोसरी उर्फ कृष्णा लिंगय्या उर्फ वेणुगोपाल (४०) याच्या नेतृत्वात करत होते. वेणुगोपाल हा कल्याण रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून एटीएसच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून डोंबिवली, विक्रोळी आणि घाटकोपरच्या कामराजनगर व माता रमाबाई आंबेडकर नगरातून अन्य संशयितांना अटक केली होती.एटीएसकडून मुंबईतील त्यांच्या अन्य कनेक्शनची झाडाझडती सुरू केली. याबाबत त्यांनी धारावीतील निवृत्त शिक्षक प्रभाकर माचा यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली होती. सायन प्रतीक्षानगर परिसरात प्रभाकर नारायण माचा (६४) हे मुलगा आणि सुनेसोबत राहायचे. ते तेलंगणा उद्यमा संघीभावा संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था कामगारांसाठी कार्यरत होती. निवृत्तीनंतर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून कामकाज सुरू ठेवले होते.२ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यासाठी मुलगी मुंबईत आली होती. २३ जानेवारी रोजी सकाळी ९च्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. नक्षलवाद्यांसंबंधी सुरू असलेल्या चौकशीनंतर त्यांनी आत्महत्या केली. या चौकशीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.प्राथमिक तपासात माचा हे हृदयविकाराचे रुग्ण होते. पत्नीच्या मृत्यूमुळे त्यांना धक्का बसला होता. पत्नीच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही कुणाविरुद्ध तक्रार नसल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी दिली.
‘त्या’ चौकशीनंतर माचा यांनी केली आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 5:00 AM