Join us

मानवी चुकाच कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:45 AM

दक्षिण मुंबईमध्ये जवळपास १९ हजार इमारती ५० ते ६० वर्षे जुन्या असून, त्यांची देखभाल कोणी करत नाही. जमीन मालकाला दरमहा ५० ते ६० रुपये भाडे मिळते.

- रमेश प्रभू

दक्षिण मुंबईमध्ये जवळपास १९ हजार इमारती ५० ते ६० वर्षे जुन्या असून, त्यांची देखभाल कोणी करत नाही. जमीन मालकाला दरमहा ५० ते ६० रुपये भाडे मिळते. ते अत्यल्प असल्याने, त्यातून इमारतीची देखभाल व दुरुस्ती करता येत नाही. अशा इमारतीच्या देखभालीची जबाबदारी मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाने करण्याची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, परंतु ज्या इमारती आज मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांची दुरुस्ती व देखभाल हे दुरुस्ती मंडळ करू शकत नाही. म्हणून अशा इमारती दोन कारणाने उद्ध्वस्त किंवा खाली कोसळतात. (१) नैसर्गिक आपत्ती (२) मानवी आपत्ती.आतापर्यंत मुंबईतील ज्या इमारती कोसळल्या आहेत व त्यामुळे जी मनुष्यहानी झालेली आहे, त्याला मानवाच्या चुकाच कारणीभूत आहेत. जसे आता अलीकडील घटना म्हणजे, घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत कोसळली आहे, त्याला मानवी चुका किंवा चुकीचे धोरण कारणीभूत आहे. तळमजल्यावरील नूतनीकरण करताना स्तंभ व (कॉलम आणि बीम ) यांच्या रचनेला धक्का लागल्यामुळे, इमारतीचा समतोल बिघडला आणि इमारत कोसळली व तिचा आधार गेला. यात १७ लोकांचे प्राण गेले, अनेक लोक जखमी झाले. मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले.मोडकळीस आलेल्या इमारतींकडे रहिवासी/भाडेकरू व त्यांचे जमीन मालक, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ व मुंबई महानगरपालिका आणि शासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जेव्हा इमारती कोसळतात, तेव्हा ते त्यांची चौकशी करायचे ठरवितात आणि नंतर ते विसरूनही जातात. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि आपत्तीग्रस्त रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे. आज इमारतीची देखभाल करणे व योग्य कारवाई करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. नियमानुसार ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत, त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट दर ३ वर्षांनी एकदा करून, त्याच्या अहवालानुसार ६ महिन्यांनी दुरुस्ती करावी. त्याचा अहवाल संबंधित महानगरपालिकेला सादर करणे आवश्यक आहे, पण या बाबतीत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी महापालिकेने केलेली दिसून येत नाही.खूप लोक आपल्या घरी कोणतीही काळजी न घेता, आपल्या सदनिकेमध्ये बदल करतात. इमारतीची दुरुस्ती किंवा गळती बंद करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाहीत. त्यामुळे इमारत ठिसूळ होऊन लवकर कोसळते. सध्या दक्षिण मुंबईमध्ये १९ हजार उपकरप्राप्त इमारती आहेत, त्याची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही, तसेच त्यांचा पुनर्विकास होत नाही. त्यामुळे या इमारती अतिधोकादायक म्हणजेच सी श्रेणीमध्ये आल्या आहेत. या इमारती कधीही कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे महानगरपालिकेने या इमारतींची योग्य प्रकारे देखभाल करावी. त्याचप्रमाणे, अशा उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी सरकारने द्यावी आणि या इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर करून घ्यावा. असे केल्याने इमारत कोसळून होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाण नष्ट होऊन होणारी जीवितहानी थांबेल.(लेखक ज्येष्ठ वास्तुविशारद आहेत.)