Join us

‘मॅकबुक’ भेट देतो सांगत चार लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियावर मैत्री करून एका आयटी व्यावसायिकेला ३ लाख ९८ हजारांचा चुना लावण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सोशल मीडियावर मैत्री करून एका आयटी व्यावसायिकेला ३ लाख ९८ हजारांचा चुना लावण्यात आला. एक ‘मॅकबुक’ भेट म्हणून स्वीकारण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी समतानगर सायबर सेलकडून परदेशी नागरिकासह दोघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडित तक्रारदार हिच्यासोबत डोमिनिक मसन नामक व्यक्तीने सोशल मीडियामार्फत मैत्री केली होती. तो स्वतःला युकेचा रहिवासी म्हणवत तिच्याशी चॅटिंग करायचा. दरम्यान, तिच्यासाठी एक मॅकबुक त्याने पाठविले असून ते तिने स्वीकारावे अशी विनंती त्याने तिला केली. त्यानंतर काही दिवसांनी तिला एक फोन आला. सदर व्यक्ती दिल्ली विमानतळावरून बोलत असून त्याने कस्टम ड्युटी म्हणून २८ हजार रुपये कथित मॅकबुकसाठी पाठविण्यास सांगितले. तर काही दिवसांनी मसन याने तिला ३ लाख ९८ हजार त्याने दिलेल्या खात्यात जमा करण्यास सांगितले. तिने पैसे जमा करविल्यावर पुन्हा त्याने तिला ३ लाख ८ हजार रुपये आमिष देत भरायला सांगितले. तेव्हा तिला संशय आला आणि तिने समतानगर सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार तिने ज्या बँक खात्यात पैसे जमा केले त्या अंधेरीतील बँकेत पोलीस पथक गेले. जे खाते अनिता इंजिनीअर नावाने होते. अनिताकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. ज्यात एनआयआर मायकल नामक सोशल मीडियावरील मित्राने हे खाते उघडायला सांगितले असे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार मायकल व मसन हे दोघे एकच असल्याचा संशय पोलिसांना असून इंजिनीअरला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.