मादाम कामा वसतिगृहाची दारे वर्षभरानंतरही बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:12 AM2019-01-25T02:12:56+5:302019-01-25T02:13:01+5:30
देशभरात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहीम जोमाने राबवताना मुलींना शिक्षणाबरोबरच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मुंबई : देशभरात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहीम जोमाने राबवताना मुलींना शिक्षणाबरोबरच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी विद्यापीठाची दोन वसतिगृहे अपुरी पडत असल्याने मंत्रालयाशेजारी मादाम कामा वसतिगृह उभारण्यात आले.
मात्र, वसतिगृहाच्या उद्घाटनाला वर्ष होऊनही वसतिगृह विद्यार्थिनींसाठी खुले केलेले नाही. विद्यापीठात अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे, गॅलरी अशा सुविधांची वानवा आहे. सोबत अद्याप वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींकडून किती भाडे आकारले जाईल, कोणत्या दराने याची निश्चिती करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रातून अनेक मुली मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्यासमोर इतर अनेक प्रश्नांसह सुरक्षितपणे राहायचे कुठे, असा मोठा प्रश्न असतो.वसतिगृहाची वास्तू उभारली असेल तर अद्याप तेथे काहीच सोयी-सुविधा उपलब्ध का करून दिल्या जात नाहीत, असा सवाल युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत उपकुलसचिव (जनसंपर्क) डॉ़ लीलाधर बनसोड यांनी सांगितले की, विद्यार्थिनींसाठी माफक दरात शुल्क निश्चिती आणि संबंधित बाबींसाठी समितीचे गठण करण्यात आले होते. समितीचे काम पूर्ण झाले असून व्यवस्थापन परिषदेची मान्यता मिळताच हे वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येईल.