‘मेड इन चायना’कडे ग्राहकांची पाठ, भारतीय बनावटीच्या ‘लाइट्स’ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:19 AM2017-10-14T03:19:19+5:302017-10-14T03:19:51+5:30
दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. घर, कार्यालयांमध्ये आकर्षक रोषणाईसाठी अनेक जण दिवे
कुलदीप घायवट
मुंबई : दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. घर, कार्यालयांमध्ये आकर्षक रोषणाईसाठी अनेक जण दिवे, पणत्यांप्रमाणे विजेच्या माळांना पसंती दर्शवित आहेत. या माळा खरेदीचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, सोशल मीडियावरील ‘अॅँटी चायना’ कॅम्पेनचा परिणाम म्हणून ग्राहकांनी ‘मेड इन चायना’कडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यंदा भारतीय बनावटीच्या लाइट्स आणि तोरणांच्या माळांना ग्राहक पसंती देत आहेत.
घाटकोपर, दादर, लालबाग, गिरगाव, मस्जिद येथील बाजार दिवाळीच्या वस्तूंनी सज्ज झाले आहेत. या बाजारामध्ये अनेक वेगवेगळ््या प्रकारच्या लाइट्स, बल्ब, फोकस यांची खरेदी करताना ग्राहक दिसून येत आहेत. बॉल लाइट, जेलीबॉल लाइट, चायना लाइट, ३० बल्बपट्टी लाइट, ६० बल्बपट्टी लाइट, रिबीन लाइट, फोकस बल्ब अशा वेगवेगळ््या प्रकारच्या लाइट्स बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात बॉल लाइट व जेलीबॉल लाइटला आणि तोरण लाइट व रिबीन पट्टीला ग्राहकांची चांगल्या प्रकारे मागणी आहे. बाजारातील सर्व प्रकारातील लाइट्सच्या उपकरणांचा माल हा उल्हासनगर, दिल्ली, बंगळूर व चीनमधून आणला जातो, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. बॉल लाइट, जेलीबॉल लाइट यांच्या किमती २०० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. ३०, ६० बल्बपट्टी लाइट, रिबीन लाइट यांची ३०० ते ४०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. लाइट्ची किंमत ही २०० ते ५०० रुपयांपर्यंत आहेत. ५० रुपयांपासून ते ५०० रुपयापर्यंत यांची किंमत आहे. चायना लाइटची किंमत ही १०० ते २०० रुपयांपर्यंत आहे.