मुंबई : पालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रशासनाने हायटेक सुविधा सुरू केल्या. त्यानुसार आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शाळा सुरू आहेत. अशा वेळी मोबाइल नसलेल्या पालिका शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना टॅबमुळे दिलासा मिळाला असता. परंतु, तब्बल ११ हजार ८०० टॅब नादुरुस्त असल्याने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने २००७ पासून २७ शालेय वस्तूंचे वाटप सुरू केले. मात्र कधी सहामाही परीक्षेनंतर पुस्तके मिळाली तर कधी पावसाळ्यानंतर छत्र्या मिळत असल्याने ही योजना अडचणीत आली. या वस्तूंच्या दर्जेबाबतही अनेक वेळा शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत; मात्र तिची अवस्था आता विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅबची झाली आहे. सन २०१५-२०१६ मध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले. मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा बंद आहेत. आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले मात्र पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना मोबाइल परवडत नाही. त्यात टॅबही नादुरुस्त असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी निदर्शनास आणले.
टॅब चायना मेड असल्याचा आरोप
पालिका शाळांसाठी ४३ हजार टॅब घेण्यात आले. यापैकी ११,८०० नादुरुस्त आहेत. हे टॅब चायना मॉडेल असल्याचा आरोप खान यांनी केला. पालिका शाळेतील हजेरीपट वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना वस्तू मोफत देण्यात येत आहेत. त्याचबरोबर व्हर्च्युअल क्लासेसही सुरू आहेत. डॉ. खान यांच्या हरकतीच्या मुद्द्याला प्रशासनाकडून शिक्षण समितीच्या पुढील बैठकीत उत्तर देण्यात येईल, असे शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी स्पष्ट केले.