दिवाळीत मुंबई ‘मेड इन इंडिया’ने लखलखणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:52 AM2018-10-26T02:52:48+5:302018-10-26T02:52:57+5:30
चायना बनावटीच्या लाईट्सची मक्तेदारी मोडून काढत मोठ्या दिमाखात मेड इन इंडिया बनावटीच्या लाईट्सने बाजारात प्रवेश मिळवला आहे.
- चेतन ननावरे
चायना बनावटीच्या लाईट्सची मक्तेदारी मोडून काढत मोठ्या दिमाखात मेड इन इंडिया बनावटीच्या लाईट्सने बाजारात प्रवेश मिळवला आहे. लक्षवेधक डिझाईन आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे यंदा बाजारात ७० टक्के ग्राहकांची पसंती चायना लाईट्सऐवजी भारतीय बनावटीच्या हँगिंग स्वरूपातील कंदील व झुंबराला मिळत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच दिवाळीत मुंबई ही चायना लाईट्सऐवजी भारतीय बनावटीच्या लाईट्सने लखलखताना दिसणार आहे.
दक्षिण मुंबईतील लोहार चाळीतील लाईट्सचे विक्रेते संजय सोलंकी यांनी सांगितले की, यंदा ग्राहकांची पहिली पसंती भारतीय बनावटीच्या कंदील व झुंबराला मिळत आहे. या वस्तूच्या एका नगाची किंमत अवघ्या १०० रुपयांपासून सुरू होत असून पुढे १ हजार १०० रुपयांपर्यंत वाढत जाते. दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असल्याने ग्राहकांकडून या वस्तूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनेरी रंगाने सजावट केलेल्या या कंदील आणि झुंबरांमध्ये एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र उत्तम बनावटीमुळे त्याकडे थेट पाहिल्यावरही डोळ्यांना इतर एलईडीप्रमाणे त्रास होत नाही. त्यामुळे ग्राहकही डोळे बंद करून या लाईट्सची खरेदी करत आहेत.
लाईट्सचे विक्रेते शंकर शर्मा यांनी सांगितले की, भारतीय बनवटीची समई, झुंबर प्रकारातील लाईट्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सोनेरी रंगांमध्ये तयार केलेल्या या लाईट्समध्ये एलईडी लावली असली, तरी त्यातून सोनेरी प्रकाश बाहेर पडतो. आत्तापर्यंत चित्रपटांत किंवा महालात दिसणाºया कंदील आणि झुंबरांची प्रतिकृती या लाईट्समधून जाणवते. त्यामुळे ग्राहकांकडून प्रथमच चायना बनावटीच्या लाईट्सला बगल देत भारतीय बनावटीच्या लाईट्सला मागणी आहे.
>भारतीय झुंबर
चायना कँडलवर भारी!
लाईट्सच्या बाजारात चायना बनावटीच्या ३०० रुपये प्रति नगाच्या कँडल आणि ६०० ते ७५० रुपये प्रति नगाची किंमत असलेले फाऊंटन ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
मात्र त्या तुलनेत अवघ्या १०० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत एका नगासाठी असलेले भारतीय बनावटीचे झुंबर आणि कंदील भलतेच भाव खाऊन जात आहेत.
चायना कँडल आणि फाऊंटनमध्ये मोटर लावल्याने त्यात पाण्याचे फवारे उडताना दिसतात. विजेसह सेलवरही ही कँडल चालते. याउलट भारतीय बनावटीचे झुंबर, कंदील आणि इतर लाईट्स या विजेवर चालतात.
तरीही ७० टक्के ग्राहकांची पसंती भारतीय बनावटीच्या लाईट्सला असून केवळ ३० टक्के ग्राहकांकडून चायना बनावटीच्या लाईट्सला मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
झुंबर लाईटस् सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत़ त्यामुळे त्याची विक्री अधिक होत आहे़